पुणे: लोकमान्य टिळक यांची आज 103 वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रतिष्ठित, समाजासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या लोकांचा लोकमान्य टिळक पुरस्कार सन्मान करण्यात येतो. यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला.
पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमावेळी पुणेकर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्यासाठी लोकमान्य टिळक वापरायचे तसंच खास उपरणं मोदी यांना देण्यात आलं. लोकमान्य टिळक यांच्या ओळख असलेली पुणेरी पगडी यावेळी पंतप्रधानांना घालण्यात आली. पुरस्काराचं सन्मानपत्र, ट्रॉफी देण्यात आली. या ट्रॉफीत भगवत गीता, लोकमान्यांची पगडी, केसरी वृत्तपत्राचा पहिला अंक आणि लोकमान्यांची प्रतिमा आहे. लोकमान्य टिळक पुरस्कारात एक लाख रूपयांची रक्कम दिली जाते. ही रक्कम पंतप्रधानांच्या सुचनेप्रमाणे नमामी गंगे प्रकल्पासाठी देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. तेव्हा टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना मराठीतून भाषणाची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांना मी कोटी कोटी वंदन करतो, असं मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार का दिला जातोय, यावर टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक यांनी मोदींना पुरस्कार देण्यामागची भूमिका सांगितली. भारताच्या प्रगतीत अतुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. हा पुरस्कार दिल्याने महान व्यक्तीचा सन्मान होतो आणि तरूणांसमोर आदर्श उभा राहतो. यंदाचा पुरस्कार कुणाला देण्यात यावा, यावर चर्चा करण्यासाठी सर्व विश्वस्त चर्चा करण्यासाठी बसले. तेव्हा आमच्यासमोर केवळ एकच नाव आलं, ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. लोकमान्य टिळक यांनी स्वतंत्र, आधुनिक आणि बलाढ्य भारताचं स्वप्न पाहिलं होतं. राष्ट्रीयत्व, भारताची पुरातन विद्या, राष्ट्रप्रेम, स्वदेशी, स्वदेशी अर्थकारण लोकमान्य टिळकांनी सांगितलं होतं. तोच विचार पंतप्रधान मोदी यांच्या कार्यातही दिसतो. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, नवे तंत्रज्ञान, नवे शैक्षणिक धोरण या सारख्या कार्यात टिळकांचा विचार दिसतो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा सन्मान करताना आम्हाला मनोमन आनंद होत आहे, अशी प्रतिक्रिया श्री.टिळक यांनी दिली.