गतविजेते ऑस्ट्रेलियाचा सामना आज श्रीलंकेशी  

सहा वेळा आयसीसी महिला टी-२० विश्वचषक जिंकणारा संघ ऑस्ट्रेलिया, शनिवारी शारजाह येथे श्रीलंकेशी भिडेल. एकीकडे ऑस्ट्रेलिया त्यांच्या मोहिमेची सुरुवात करतील तर दुसरीकडे श्रीलंका या स्पर्धेत जीवित राहण्याचा पूर्ण प्रयत्न करतील. गुरुवारी पाकिस्तानकडून पराभूत झाल्यामुळे श्रीलंकेसाठी आजचा हा सामना जवळजवळ करो की मरो असणार आहे.

 

आमने-सामने

ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांनी एकमेकांविरुद्ध सात टी-२० सामने खेळले आहेत आणि त्या सर्व सामन्यांत ऑस्ट्रेलिया विजयी झालेत. त्या सात सामन्यांपैकी तीन सामने आयसीसी महिला टी-२० विश्वचषकादरम्यान खेळले गेलेत.

 

 संघ

ऑस्ट्रेलिया: ॲलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍशले गार्डनर, किम गार्थ, ग्रेस हॅरिस, अलाना किंग, फीबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, सोफी मोलिनी, बेथ मूनी, एलिस पेरी, मेगन शुट, ॲनाबेल सदरलँड, टायला व्लामिंक, जॉर्जिया वेअरहॅम

श्रीलंका: चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षिका सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंदिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, शशिनी गिम्हानी, अमा कांचना

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे

बेथ मुनी: ऑस्ट्रेलियाची ही डावखुरी सलामीवीर सध्याच्या आयसीसी रँकिंग्समध्ये अव्वल क्रमांकाची फलंदाज आहे. या कॅलेंडर वर्षात, या बेधडक फलंदाजाने १२ आंतराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये १२१च्या स्ट्राइक रेटने आणि जवळपास ४०च्या सरासरीने ३५० धावा केल्या आहेत.

मेगन शुट: ऑस्ट्रेलियाची ही उजव्या हाताची वेगवान सनसनाटी ११२ आंतराष्ट्रीय टी-२० डावात १३७ विकेट्स घेऊन संघाची सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. तिच्या भांडारात घातक इनस्विंगर्स आहेत. त्याचबरोबर नवीन चेंडूने ती कमालीची कामगिरी करू शकते.

चमारी अथापथु: श्रीलंकेच्या कर्णधाराने तिच्या आंतराष्ट्रीय टी-२०च्या कारकिर्दीत आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत, त्यापैकी एक ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मागील सामन्यात मोठ्या धावसंख्येपासून वंचित राहिल्यानंतर, ही डावखुरी सलामीवीर छाप पाडण्यासाठी उत्सुक असेल. याशिवाय, तिने पाकिस्तानविरुद्ध तीन विकेट्स घेऊन तिचा गोलंदाज म्हणून आत्मविश्वास वाढला असेल.

सुगंदिका कुमारी: श्रीलंकेच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने पाकिस्तानविरुद्धच्या मागील चकमकीत पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्स पटकावून तिच्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने एकूण चार षटकात १९ धावा दिल्या आणि तीन गडी बाद करून प्रभावित केले.

 

हवामान

सुमारे ३८ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. भरपूर सूर्यप्रकाश देखील असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ५ ऑक्टोबर २०२४

वेळ : दुपारी ३:३० वाजता

स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार