माकडांवर धनुष्यबाणाने हल्ला; माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस

ठाणे : येऊर परिसरात आयोजित पार्ट्यांमध्ये मोठमोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याबरोबरच विद्युत रोषणाई केली जाते. यामुळे वन्यजीवांवर परिणाम होत असतानाच, आता येथे वन्यजीवांवर हल्ले होऊ लागले आहेत. नुकत्याच घडलेल्या दोन घटनांमध्ये धनुष्य-बाणाने माकडांना जखमी केल्याचे समोर आले असून हल्लेखोरांची माहिती देणाऱ्यास २५ हजारांचे बक्षीस वनविभागाने जाहीर केले आहे.

येऊर परिसरात माकडांवर हल्ल्याच्या सलग दोन घटना समोर आल्याने वनविभाग सतर्क झाला आहे. धनुष्य-बाणाने माकडांना जखमी करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेले माकड हे वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या अनुसूची-१ मधील संरक्षित प्राणी असल्याने या घटनेला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

वनविभागाने आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून नागरिकांची मदतही मागवण्यात आली आहे. या घटनेत सामील आरोपींबाबत कोणतीही माहिती असल्यास ती वनविभागाला कळवावी. माहिती देणाऱ्यास २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार असून त्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वनक्षेत्रपाल संतोष डगळे आणि वनपाल सी. जे. खांडवी यांना नागरिकांनी ९८९२६८४२६६ आणि ९३७०११४३९९ या क्रमांकांवर तत्काळ संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

येऊर हा ठाणे शहरालगतचा महत्त्वाचा वनक्षेत्र असून येथे विविध वन्यजीवांचे वास्तव्य आहे. अशा प्रकारच्या घटना वन्यजीवांसाठी धोकादायक असून पर्यावरणीय संतुलनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आरोपींना लवकरात लवकर पकडण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून वनविभागाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.