अथर्व जोशी पुरुष एकेरीचा नवीन राज्य अजिंक्यवीर

सिनियर राज्य बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत ठाण्याचा दबदबा

ठाणे: योनिक्स सनराईज २री महाराष्ट्र सिनियर राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा २०२५ रायगड येथील उलवे मध्ये झाल्या. या स्पर्धेत ठाणे बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत पाचही गटांच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा अभूतपूर्व पराक्रम केला. 17 जिल्ह्यामधून एकूण १७७ खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला व ठाण्याच्या खेळाडूंनी दाखवलेला सर्वोत्कृष्ट पराक्रम महाराष्ट्र बॅडमिंटनमध्ये विशेष ठसा उमटवणारा ठरला.

या स्पर्धेचा मुख्य क्षण होता पुरुष एकेरीचा गटातील अथर्व जोशीचा सनसनाटी विजय. गुडघ्याची दुखापत आणि तीव्र वेदनांचा सामना करत त्याने जिद्दीच्या जोरावर राज्य अजिंक्यपद जिंकत सर्वांना थक्क केले. कोर्टवरील त्याचा वेग, तंत्र, आणि कठोर मानसिक शक्ती संपूर्ण स्पर्धेत चमकत राहिली. त्याचबरोबर ओम गवंडीने रौप्य आणि सिद्धार्थ दासने कांस्य पदक जिंकत ठाण्याच्या खेळाडूंनी या गटात एकत्रित वर्चस्व राखले.

महिला एकेरीत आर्या कोरगांवकर हिने असाधारण सातत्यपूर्ण खेळ करत रौप्यपदक मिळवले. तिचे कौशल्यपूर्ण रिटर्न्स आणि कोर्टवरील शिस्तबद्ध हालचाली विशेष उल्लेखनीय ठरल्या. पुरुष दुहेरीत ठाण्याची युवा जोडी फक्त १९ वर्षांचे आर्यन बिराजदार आणि अर्जुन बिराजदार या ज्युनियर भावांच्या जोडीने वरिष्ठ गटात न घाबरता अनुभवी खेळाडूंचा सामना करत रौप्यपदक जिंकून स्पर्धेत नवा उत्साह निर्माण केला.

महिला दुहेरीत रीद्धी चाफेकरने सुवर्णपदक पटकावले, तर सोनाली मिर्खेलकरच्या कांस्यपदकाने ठाण्याची कामगिरी अधिक भक्कम झाली. शिवाय मिश्र दुहेरीच्या गटात तर ठाणे बॅडमिंटन अकॅडमीने इतिहास घडवला. या गटातील सर्व पदके ठाण्याच्याच खेळाडूंनी जिंकत अभूतपूर्व विक्रम नोंदवला. दीप राम्भीया आणि सोनाली मिर्खेलकर यांनी सुवर्ण; इशिता कोरगांवकरने रौप्य; तर अमन नौशाद-अनामिका सिंग आणि सनिध्य एकाडे-नंदिनी भारद्वाज यांनी कांस्यपदके जिंकली.

या अभूतपूर्व यशामागे ठाणे येथील सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीचे संचालक, दादोजी कोंडदेव क्रीडा पुरस्कार तसेच महाराष्ट्र शासनाचा जीवनगौरव पुरस्कारप्राप्त श्रीकांत वाड सर यांचे कुशल मार्गदर्शन हे केंद्रस्थानी राहिले.

ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव व छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते मयूर घाटणेकर सर यांचे सततचे मार्गदर्शन, आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू व छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार प्राप्त अक्षय देवलकर, तसेच प्रशिक्षक मितेश हाजिरनीस, राजीव गणपुले आणि एकेंद्र दर्जी यांचे प्रशिक्षण सत्रांदरम्यानचे तांत्रिक मार्गदर्शन, फिटनेसची शिस्तबद्ध तयारी आणि विश्लेषणाधारित कोचिंग हे ठाण्याच्या सर्व खेळाडूंच्या कामगिरीला आवश्यक धार देणारे ठरले. प्रशिक्षक, व्यवस्थापन व खेळाडू यांच्यातील ही सांगड ठाण्याच्या वर्चस्वाच्या पाठीशी असलेली सर्वात महत्त्वाची ताकद ठरली.