ठाणे : मोबाईलधारक सेल्फी प्रेमींनी वाकडी वाट करून तीन दिवसांपूर्वी खुल्या झालेल्या ‘अटल सेतू’ला भेट देत सेल्फीचा छंद जोपासला. मात्र या छंदामुळे त्यांना सुमारे तीन लाखांचा दंड भरावा लागला आहे.
या सेतूवर वाहनांची वेगमर्यादा अजिबात लक्षात न घेता अनेकजण खाली उतरले आणि रस्त्यातच आपली हौस भागवली. वाहतूक पोलिसांनी त्यांना रोखूनही सेल्फी आणि फोटोज ‘क्लिक’केलेच. अशा बेपर्वा 300 चालकांविरुद्ध दोन लाख 90 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, कारवाई वाढेल तशी संख्यादेखील कमी होईल, असे नवी मुंबईच्या ‘न्हावा शेवा’वाहतूक युनिट’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम. मुजावर यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले. त्यांंच्यासह पोलीस उपनिरीक्षक शिंदे आणि पोलीस हवालदार राठोड व पाच पोलीस कर्मचारी पथक सातत्याने कार्यरत आहेत.
नुकतेच शिवडी न्हावा-शेवा सी-लिंकचे (अटल सेतू) उद्घाटन झाले आहे. या पुलावर दुचाकी व तीन चाकी वाहनांनाही प्रवेश बंदी घालण्यात आली, शिवाय सेतूवर चारचाकी वाहनांकरिता वेग मर्यादा 100 किलोमीटर प्रति तास इतकी ठेवण्यात आली आहे. या पुलावर कोणत्याही परिस्थितीत विनाकारण थांबवण्यास आणि वाहन पार्क करण्यासाठी सक्त मनाई करण्यात आली आहे. असे असतानादेखील अनेक वाहन चालक त्यांची वाहने अटल सेतूवर पार्क करून वाहनातून खाली उतरून सेल्फी काढण्यात तसेच फोटो काढण्यामध्ये व्यस्त होतात. या प्रकारामुळे भविष्यात एखादा गंभीर अपघात होऊ शकतो. अशा वाहन चालकांच्या बेशिस्त वर्तणुकीला आळा घालण्यासाठी ‘न्हावा-शेवा वाहतूक’शाखेच्या वतीने विनाकारण अटल सेतूवर वाहने पार्क केलेल्या व रहदारीला अडथळा निर्माण केलेल्या एकूण 144 वाहन चालकांविरुद्ध पहिल्याच दिवशी कलम 122/177 मोटर वाहन कायद्याप्रमाणे प्रत्येकी ५०० रुपये ते १५०० रुपये इतक्या रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
त्याचप्रमाणे ‘अटल सेतू’वर विनाकारण थांबलेल्या पर्यटकांना आणि उगाच रेंगाळणा-या लोकांना ‘सेतू’वरुन हटवण्यासाठी दोन गस्ती पथके नेमण्यात आल्याची ‘वेळ ’ आली आहे. वाहतूक पोलिसांनी त्यांना सांगूनही ते हटले नाहीत. तरीसुद्धा अटल सेतूवर विनाकारण थांबलेल्या लोकांची संख्या काही कमी झाली नाही. अखेरीस नियमांचे उल्लंघन करणा-या वाहन चालकांविरुद्ध सतत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे,असे ‘न्हावा शेवा’वाहतूक युनिटचे पोलीस निरीक्षक मुजावर यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.