ठाणे: शिकण्यासाठी वय नसते” हे अनेकदा ऐकायला मिळते, पण ठाण्यातील ज्योती शहाणे यांनी ते आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांनी मराठी विषयात एम.ए.ची पदवी उत्कृष्ट गुणांसह संपादन करत अनेकांसाठी प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे.
जोशी-बेडेकर महाविद्यालयातून मिळवलेल्या या यशामुळे शिक्षणाची आवड आणि जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
ज्योती शहाणे यांच्यासोबत विविध वयोगटातील निवृत्त तसेच नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनीही एम.ए. पूर्ण केले. प्रफुल्ल जठार, एकनाथ शेडगे, विजया कऱ्हाळे, संजीवनी कापडे, रश्मी जोशी, कल्पना सांगळे, अंजली ठाकूर यांसारख्या मित्र-मैत्रिणींसह त्यांनी पुन्हा एकदा कॉलेज जीवनाचा आनंद अनुभवला. अभ्यास, परीक्षा, सहली आणि विविध उपक्रमांमुळे गेलेली तरुणाई जणू परत मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
आपला अनुभव सांगताना ज्योती शहाणे म्हणाल्या की, “५० वर्षांपूर्वी ज्या कॉलेजमधून मी बी.कॉम. केले, त्याच कॉलेजमधून आज एम.ए. पूर्ण करण्याचा आनंद अवर्णनीय आहे.” सुरुवातीला वयामुळे संकोच वाटत होता, मात्र विभागप्रमुख डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश महाडीक आणि प्रा. राजश्री माने यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास वाढला आणि शिक्षणाचा प्रवास आनंददायी झाला.
विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, डॉ. महेश बेडेकर आणि प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले. आता मराठी विषयातून पीएच.डी. करण्याचा त्यांचा मानस असून, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांनी नवी प्रेरणादायी दिशा निर्माण केली आहे.