सहाय्यक आयुक्तसह दोघे लाच प्रकरणी जाळ्यात

ठाणे : उल्हासनगर महापालिका येथील सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती क्र. एक कार्यालय व प्रभारी मुकादम (प्रभाग समिती क्र. एक) यांना लाच स्वीकारताना ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. या दोन कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त उल्हासनगर महापालिकेचा खाजगी वाहन चालक याचाही सहभाग आहे. उल्हासनगरमध्ये 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना या तिघांना पकडण्यात आले.

प्रभाग क्र. एकचे सहाय्यक आयुक्त अजित रत्ना गोवारी, प्र. क्र. एकमधील प्रभारी मुकादम आलोसे प्रकाश राजू संकत आणि महानगरपालिकेचा खाजगी वाहन चालक प्रदीप निवृती उमाप यांना लाच स्वीकारताना पकडले. अजित गोवारी आणि आलोसे राजू संकत यांनी 50 हजार यांची लाच मागितली होती आणि त्यांनी 20 हजार रुपयांची लाच स्वीकारली आहे. या घटनेप्रकरणी तक्रारदार यांचा बांधकाम व्यवसाय आहे. उल्हासनगर महापालिकेच्या अंतर्गत येणा-या  जागेवर करत असलेल्या बांधकामावर कारवाई न करण्यासाठी गोवारी आणि प्रकाश संकत यांनी लाच मागितली होती. याबाबतची तक्रार तीन मार्च 23 रोजी दिली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने लोकसेवक संपतने तक्रारदाराला सहा मार्च 23 रोजी बोलावल्याचे निष्पन्न झाले. त्याची पडताळणी कारवाई केली असता गोवारी यांनी संकत याला लाच घेण्यास प्रोत्साहित केले आणि लाच घेण्यासंदर्भात पुढील बोलणीही करण्यास संकेतला सांगितले होते. त्यानुसार संकतने बोलणी केल्यावर 50 हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती 20 हजार रुपये त्याच्या वरिष्ठांसाठी स्वीकारण्याचे कबूल केले. 20 हजार रुपयांची रक्कम आलोसे संकतनी स्वीकारून, खाजगी व्यक्ती प्रदीप उमाप याच्याकडे दिली होती.

एसीबीच्या अधिका-यांनी उमापला 6 मार्च 23 रोजी दुपारी 01.40 वाजता रंगेहात पकडले आहे. या तीनही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू आहे. याप्रकरणी ठाणे परीक्षेत्र येथील अँटी करप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे आणि अतिरिक्त अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी मार्गदर्शन केले, अशी माहिती ब्युरोचे पोलीस निरीक्षक योगेश देशमुख यांनी दिली.