टेलिग्राम अ‍ॅपद्वारे तब्बल 18 लाख 44 हजारांची फसवणूक

ठाणे : अज्ञात  व्यक्तींसोबत पैशांसंबंधी कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करुच नका, असे ठाणे पोलीस वारंवार सांगत असूनही खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघांनी विविध व्यवहार केल्यामुळे त्यांची एकूण 18 लाख 44 हजार 208 रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

29 जानेवारी 23 ते 4 फेब्रुवारी 23 रोजी आंबिवली येथे राहणा-या 29 वर्षीय महिलेच्या मोबाईलवर अनोळखी महिलेने टेलीग्राम अ‍ॅपद्वारे टास्क पूर्ण करुन चांगला नफा देण्याचे आश्वासन दिले. संबंधित महिलेने त्या अनोळखी महिलेच्या शब्दांवर विश्वास ठेवला आणि तिने 12 लाख 29 हजार 28 रुपये आॅनलाईन गुंतवले. तसेच साक्षीदार फैजू बिजापूर यांनाही टेलिग्राम, इंस्टाग्रामवर टास्क देऊन चांगला नफा व कमिशन मिळणार असल्याचेही आमिष दाखवले आणि फैजूचेही सहा लाख 15 हजार रुपये घेतले. दोघांकडून या अज्ञात महिलेने एकूण 18 लाख 44 हजार रुपये घेऊन त्यावर कोणताही नफा दिला नाही व गुंतवलेली रक्कम परत केली नाही.

या दोघांची आर्थिक फसवणूक केल्याबाबत फिर्यादींनी दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात मोबाईलधारक महिलेविरुद्ध आय.टी. अ‍ॅक्टद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक एन.आर.केचे हे करत आहेत.