कडोंमपा महासभेत गाजला सुरक्षेचा मुद्दा
कल्याण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आज पार पडलेल्या महासभेत स्थायी समिती सदस्य, महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि शिक्षण समिती सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. प्रत्येक पक्षाच्या गटनेत्याकडून प्राप्त झालेली नावे महापौर हर्षाली चौधरी यांनी घोषित केली. तर आजच्या या महासभेत सुरक्षेचा मुद्दा गाजला.
महासभा असल्याने आज महापालिका मुख्यालयात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आल्याने महापालिकेला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पोलीसांनी नगरसेवकांची झाडाझडती घेतल्याने नगरसेवक आक्रमक झाले. महापालिकेचे सुरक्षारक्षक असताना, पोलीसांची गरज काय, आम्ही चोर, गुंड आहोत का? असा सवाल शिवसेना नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी केला. तर महिला नगरसेविकांच्या देखील पर्सची तपासणी केल्याने या महिला नगरसेविका देखील प्रशासनावर भडकल्याचे पाहायला मिळाले.
आजच्या या महासभेत सर्व सदस्यांना पीठासीन अधिकारी महापौर हर्षाली चौधरी यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. तर सभागृह नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक वरुण पाटील यांची निवड करण्यात आली. कल्याण-डोंबिवली परिसरात यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या शिवम वखरे, प्रणव बेंढारी आणि पारस मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे अपंग विकास महासंघाचे अशोक भोईर यांना देखील त्यांच्या कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.
यांनतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे 16 स्थायी समिती सदस्य, 11 महिला व बालकल्याण समिती सदस्य आणि 11 शिक्षण मंडळ सदस्यपदी नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली. 16 स्थायी समिती सदस्यांमध्ये शिवसेना, मनसे राष्ट्रवादी या शिव आघाडीचे आठ सदस्य, भाजपाचे सात सदस्य तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका सदस्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये शिवसेनेचे गजानन पाटील, जयवंत भोईर, विकास म्हात्रे, मल्लेश शेट्टी, नवीन गवळी, विजया पोटे, महेश गायकवाड आणि मनसेच्या गणेश लांडगे यांचा समावेश आहे. भाजपाच्या दिपेश म्हात्रे, मंदार हळबे, दया गायकवाड, मनिषा गायकवाड, मुकुंद पेडणेकर, नंदू म्हात्रे आणि उपेक्षा भोईर यांची तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विशाल गारवे यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
महिला बालकल्याण आणि शिक्षण मंडळ समितीच्या प्रत्येकी 11 सदस्यांमध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी शिव आघाडीचे पाच सदस्य, भाजपाचे पाच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या एका सदस्याची नियुक्ती करण्यात आली. महिला बालकल्याण समितीमध्ये शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी शिवआघाडीमध्ये रेखा म्हात्रे, ज्योती मराठे, अस्मिता मोरे, सारिका जाधव, मनसेच्या रसिका पाटील, भाजपाच्या मेघाली खेमा, डॉ. पूजा गायकवाड, सरोज राय, सुनीता पाटील, रविना माळी आणि शिवसेना ठाकरे गटाच्या तेजस्वी गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
शिक्षण मंडळ समितीमध्ये शिवसेनेचे प्रतीक पेणकर, अनघा देवळेकर, शालिनी वायले, दिपाली पाटील, मनसेचे प्रल्हाद म्हात्रे, भाजपचे अभिजित थरवळ, जतिन प्रजापती, ॲड.कविता म्हात्रे, शामल गायकर, रसिका पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाच्या अपर्णा भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान या सदस्यांच्या निवडीनंतर आता सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.