ॲप्लाईड क्लाउड अंतिम फेरीत तर आरबीआय संघ उपांत्य फेरीत

ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट करंडक

ठाणे: ठाणेवैभव आंतर कार्यालयीन क्रिकेट करंडक स्पर्धेत आज मुंबई आणि ठाण्यात दोन सामने झाले. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये क गटात झालेल्या सामन्यात ॲप्लाईड क्लाउड कॉम्प्युटिंग संघाने झी टीव्ही संघाला १२ धावांनी नमवत अंतिम फेरीत प्रवेश केला तर मुंबईतील क्रॉस मैदानात अ गटात झालेल्या सामन्यात आरबीआय संघाने ग्रुप सॅटेलाईट डेव्हलपर्स संघाचा २३ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोन्ही सामन्यात अनुक्रमे तीन विकेट घेणारा वैभव मुजागे आणि चार विकेट घेणारा सोहन तळेकर सामनावीर ठरला.

आज ठाण्यात क गटात झालेल्या सामन्यासाठी ज्येष्ठ प्रशिक्षक शशी नाईक यांना नाणेफेकीचा मान देण्यात आला. नाणेफेक जिंकत झी टीव्ही संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ॲप्लाईड क्लाउडच्या सुमित शर्मा याने सर्वाधिक ५३ धावा केल्या तर अर्जुन धीमन ३२, समूएद व्यवत्रे २८ आणि वैभव मुजागे, अजिंक्य पवार यांनी प्रत्येकी २३ धावांचे योगदान दिले. ॲप्लाईड क्लाउडने ३० अवांतर धावांच्या जोरावर आठ गड्यांच्या बदल्यात २३७ धावा केल्या. झी टिव्हीकडून एम.डी.अमीर, आग्नेय आदी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. झी टीव्ही संघाच्या फलंदाजांनी जोरदार उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु २२५ धावांपर्यंतच त्यांना मजल मारता आली. तनिष्क गवते याने सर्वाधिक ६२ धावा केल्या. त्या पाठोपाठ ऋत्विक पेडणेकर याने नाबाद ४४, हमझा खान ३५, रोहन करंदीकर याने ३४ धावांचे योगदान दिले. ॲप्लाईड क्लाउडच्या वैभव मुजागे याने ४० धावांत तीन बळी मिळवत सामनावीर होण्याचा मान पटकावला.

दुसरीकडे मुंबईत अ गटात झालेल्या सामन्यात ग्रुप सॅटेलाईट डेव्हलपर्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. ग्रुप सॅटेलाईट संघाच्या गोलंदाजांनी आरबीआय स्पोर्ट्स संघाला १६० धावांतच गुंडाळले. आरबीआय संघाच्या मृदुल मनोहर याने सर्वाधिक ४४ धावा केल्या. ग्रुप सॅटेलाईटच्या विशाल यादव आणि शमीत शेट्टी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले तर विकी दुलगच याने दोन बळी घेतले. अवघ्या १६० धावांचे लक्ष्य ग्रुप सॅटेलाईट सहज पार करेल असा विश्वास व्यक्त होत होता. मात्र आरबीआयच्या गोलंदाजांनी तिखट मारा करत ग्रुप सॅटेलाईटच्या फलंदाजांना चांगलेच जखडून ठेवले. प्रज्वल राय या एकमेव फलंदाजाने ५३ धावा करत लढत दिली. तर सर्वेश पाटील याने ३१ धावा करत संघाला आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र आरबीआयच्या सोहन तळेकर याने ३० धावात चार गडी, आणि साईराज नायर याने २२ धावा देत तीन बळी घेऊन ग्रुप सॅटेलाईट संघाला १३७ धावात रोखले.