ठाणे : राज्य शासनाची महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असून या योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी केले.
या योजनेंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजेच ज्या नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत वयाची ६५ वर्षे पूर्ण केली असतील, असे नागरिक पात्र समजण्यात येतील. ज्या व्यक्तींचे वय ६५ वर्षे आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधारकार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि स्वतंत्र ओळख दस्तऐवज असतील, तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकार्य असेल.
लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बीपीएल रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेंतर्गत किंवा राज्य / केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेंतर्गत वृध्दापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करु शकतो.
लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असावे. याबाबतचे लाभार्थ्यांने स्वयंघोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील. संबंधित व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे. पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरीत झाल्यावर या योजनेंतर्गत विहीत केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मनःस्वास्थ केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र ३० दिवसांच्या आत सबंधित सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण यांच्याकडून प्रमाणित करुन संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर ३० दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील. अन्यथा लाभार्थ्यांकडून रक्कम वसूल करण्यात येईल. निवड / निश्चित केलेल्या जिल्ह्यात, लाभार्थ्यांच्या संख्येपैकी ३० टक्के महिला असतील.
या योजनेसाठी आधारकार्ड / मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, स्वयं-घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहीत केलेली अन्य कागदपत्रे आवश्यक आहेत.