मुंबई: आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्या युतीची घोषणा झाली आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला साथ दिली आहे. आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्तिक युतीची घोषणा केली आहे.
शिंदे हे वेगळे नेते असून ते सर्वांना सोबत घेऊन जातात. कुठल्याही अटीशिवाय आम्ही ही युती करत आहोत. चळवळीतील नेत्यांना सत्तेत सहभागी करून घेण्याचे शिंदे यांनी म्हटले आहे, अशी माहिती आनंदराज आंबेडकर यांनी दिली.
या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्हीही रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारी सेना आणि दुसरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचा वारसा घेऊन चालणारी सेना आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन म्हणून मी काम केले. सर्वसामान्य माणूस आणि कार्यकर्ता हीच आपली सामाजिक बांधिलकी आहे. त्यामुळे तळागाळातील सामान्य माणसांशी नाळ तुटता कामा नये हे पथ्य पाळण्याचं काम आपण केले. आनंदराज आंबेडकर हेदेखील ज्यांनी या देशाची घटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या रक्ताचे वारस आहेत. बाबासाहेबांच्या घटनेमुळे सर्वसामान्य माणूस उच्चपदावर पोहचला. संविधानामुळे मी मुख्यमंत्री झालो, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्यामुळे संविधान महत्त्वाचे आहे. समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे. तो मुख्य प्रवाहात आला पाहिजे असं त्यांनी सांगितले.
तसेच आनंदराज आंबेडकर माझ्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते म्हणून काम करतात. त्यांना फार मोठा वारसा आहे. आज आनंदराज यांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे आनंदराज आंबेडकर यांनी पाळले. तुमचा स्वभाव सर्वसामान्यांसारखा आहे. त्यांची भूमिका आणि तळमळ सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जनसेवेची संधी दिली पाहिजे. सत्तेत गेल्यानंतरच जनतेची सेवा करू शकतो. सत्ता जनतेच्या सेवेसाठी राबवायची असते. कुठलीही सत्ता सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी वापरायची असते. अनेक योजनेतून आम्ही समाजातील घटकांना न्याय देण्याचं काम आमच्या सरकारने केले. रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू केले. लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांची सांगड घालण्याचा प्रयत्न आम्ही केला ते आनंदराज आंबेडकर यांना पटले. एका विचाराने, विश्वासाने आपण एकत्र येतो तेव्हा युती सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करेल असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.