दोन कोटींचा निधी मंजूर
डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना आणखी गती मिळत असून, दिवा शहरातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. या कामासाठी राज्याच्या नगर विकास विभागाकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वपूर्ण निधी उपलब्ध झाला आहे. यामुळे लवकरच आगासन येथे या पुतळ्याच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरु होणार आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या भागांमध्ये पायाभूत सुविधा उभारणीपासून ते स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण करण्यापर्यंत अनेक प्रकल्प राबविण्यात आले आहेत. तर आपल्या संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मतदारसंघातील प्राचीन मंदिर परिसरांचा विकास करण्यासमवेतच महापुरुषांचा सन्मान राखत त्यांची स्मारके देखील मतदारसंघात उभारण्यात येत आहेत. याच पद्धतीने खासदार डॉ.शिंदे यांच्या पुढाकाराने डोंबिवली येथील घारडा सर्कल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. मानपाडा येथे ही मेघडंबरीत विराजमान असलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच पद्धतीने दिव्यातील आगासन रोड परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे.