‘ठाणेवैभव’ इम्पॅक्ट
नगरसेवक निखिल चौधरी यांनी घेतला पुढाकार
अंबरनाथ: अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाऱ्या पादचारी पुलाची नगरपालिकेच्या आरोग्य खात्यामार्फत स्वच्छता करण्यात आली आहे. नगरसेवक निखिल चौधरी यांनी याकामी पुढाकार घेतल्याने पूल चकाचक झाला आहे. पुलावर अस्वच्छतेचे साम्राज्य असे वृत्त ‘ठाणेवैभव’मध्ये प्रसिद्ध झाले होते.
अंबरनाथच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला जोडणाऱ्या पुलावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. ठिकठिकाणी गुटखा खाऊन पिचकाऱ्यामुळे परिसर कमालीचा अस्वच्छ झाला होता. पादचारी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास जाणवत होता.
अंबरनाथ नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने बळीराम साबे, प्रमोद नाटेकर, रत्नाकर चांदस्कर आदींनी पादचारी पुलावरील अस्वच्छतेबाबत रेल्वे स्थानकप्रमुख आणि नगरपालिका प्रशासनाला पादचारी पूल 26 जानेवारीपर्यंत स्वच्छ करण्याच्या मागणीचे लेखी निवेदन दिले होते. त्यानुसार नगरसेवक निखिल चौधरी यांनी पुढाकार घेऊन आरोग्य विभाग प्रमुख महेश तायडे, उप खाते प्रमुख राजेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कानसइ हजेरी शेडचे स्वच्छता निरीक्षक आकेश म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पादचारी पुलाची सफाई मोहीम राबवून पाण्याच्या सहाय्याने पूल चकाचक करण्यात आला.