नगरपरिषद निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
अंबरनाथ: राज्य निवडणूक आयोगाने स्थगित केलेल्या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम पुन्हा जाहीर केला आहे. येत्या २० डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
अंबरनाथ नगरपरिषदेच्या स्थगित झालेल्या निवडणूकीबाबत ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी ४ डिसेंबर रोजी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार अंबरनाथ नगराध्यक्ष पद आणि प्रभाग क्र. २ ब, ३ ब, ४ अ, ४ ब, ४ क, ६ अ, ६ ब, ७ अ आणि ८ ब यासाठी पुन्हा हा सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत १० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असून निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आणि निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी ११ डिसेंबर २०२५ प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
नगरपालिकेची निवडणूक २० डिसेंबर रोजी होणार आहे. तर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अंबरनाथ नगरपरिषदेत २८ द्विसदसीय प्रभाग असून एक त्रिसदस्यीय प्रभाग आहे. असे एकूण ५९ सदस्य आणि एक नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्यात येणार आहे.
यापूर्वी २ डिसेंबर रोजी अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक होणार होती. मात्र नगरपरिषदेच्या ज्या जागेसाठी अपील दाखल होते परंतु अपिलाचा निकाल जिल्हा न्यायालयाकडून २२ नोव्हेंबर म्हणजेच २३ नोव्हेंबर किंवा तद्नंतर देण्यात आला अशा नगरपरिषदेच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका ४ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या नगरपरिषदेची निवडणूक स्थगित करण्यात आली असल्याचे आयोगाने जाहीर केले होते.