अंबरनाथला नगरपालिकेवर भगवा फडकला पाहिजे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आवाहन

अंबरनाथ: गेल्या 11 वर्षांच्या कालावधीत शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथला मजबूत काँक्रीट काम झाल्याने पुन्हा एकहाती संधी द्यावी, ती हायब्रीड स्वरूपाची सरमिसळ अशी नसावी. नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकला पाहिजे, असे आवाहन खासदार डॉ .श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांना केले .

अंबरनाथला मनसेमधून शिवसेनेत आलेले कुणाल भोईर, ॲड. स्वप्नील बागुल आणि संदीप लकडे या माजी नगरसेवकांच्या अनुक्रमे शिवाजीनगर, वडवली आणि कानसई येथील संपर्क कार्यालयाचे तसेच माजी उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांच्या पुढाकाराने बांधलेल्या भास्करनगर येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटन निमित्ताने सोमवारी सायंकाळी खा. डॉ .शिंदे यांच्या हस्ते अंबरनाथला आले होते. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी आवाहन केले.

राज्यातील इतर नगरपालिकांच्या तुलनेत अंबरनाथमध्ये शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी विकास कामे करण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली नाही, शिवसेनेच्या नगराध्यक्षांच्या त्यामुळे शिवमंदिर परिसर सुशोभिकरण, नगरपालिकेची अद्यायत वास्तू, धर्मवीर आनंद दिघे नाट्यमंदिर, अशी विकास कामे झाल्याची माहिती त्यांनी दिली.

कुणाल भोईर, ॲड. स्वप्नील बागुल, संदीप लकडे यांनी मनसेतून शिवसेनेत प्रवेश केल्याने त्याचा फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसांत होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवारीबाबतचे चित्र स्पष्ट होईल, तेव्हा मात्र शिवसेनेचे चिन्ह लक्षात ठेवून पुन्हा एकदा संधी द्यावी, राहिलेली विकासकामे पूर्ण केली जातील. पूर्वी कामांबाबत दिलेला शब्द पाळला आहे. विश्वास दाखवला म्हणून कामांची पूर्तता करण्यात आली असून नागरिकांनी योग्य तो निर्णय घेण्याचे आवाहन खासदार डॉ.शिंदे म्हणाले.

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, यांच्यासह शिवसेना महिला आघाडी, पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.