अंबरनाथ: नगरपथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर

अंबरनाथ: अंबरनाथमध्ये नगरपथविक्रेता समिती सदस्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आठ नगरपथविक्रेता यांची समिती सदस्य पदासाठी निवडणूक होणार आहे.

उपजिविका संरक्षण आणि पथविक्री अधिनियमानुसार महाराष्ट्र राज्याच्या कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार अंबरनाथमध्ये प्रथमच अशा प्रकारची निवडणूक होणार आहे. निवडून देणाऱ्या आठ सदस्यांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी तीन आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्ग, अल्पसंख्याक , आणि विकलांग तसेच दिव्यांग प्रवर्गाकरिता प्रत्येकी एका सदस्याची निवडणूक होणार आहे. याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात निवडणुकीचा कार्यक्रम देण्यात आला आहे.

महिला आरक्षण सोडत शुक्रवार 27 जून रोजी दुपारी 2 वाजता, नामनिर्देशन पत्रे वाटप आणि स्वीकारणे सोमवार 30 जूनपासून शुक्रवार 3 जुलै रोजी 11 ते 5, नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार 4 जुलै सकाळी 11 वाजता, नामनिर्देशन पत्रांची यादी त्याच दिवशी छाननी झाल्यानंतर, नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे सोमवार 7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यानंतर, त्याच दिवशी नामनिर्देशन पत्र माघार घेण्याची मुदत आहे.

निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येपेक्षा सदस्य संख्या जास्त नसेल तर निवडणूक निर्णय अधिकारी उमेदवारांची नावे घोषित करतील आणि नगरपथविक्रेता समितीमध्ये असे सदस्य निवडून आल्याचे जाहीर करणार आहेत. मतदानाची आवश्यकता भासल्यास सोमवार 14 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतदान झाल्यानंतर त्याच दिवशी मतदान निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराचे नाव नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या पथविक्रेत्यांच्या अंतिम यादीत असणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या नावे नगरपालिकेची कोणत्याही प्रकारची थकबाकी येणे असता कामा नये, त्याबाबतचा ना-हरकत दाखल्याची प्रत जोडणे बंधनकारक आहे. उमेदवार राखीव प्रवर्गातून निडणूक लढवणार असल्याच्या त्याच्याकडे संबंधित सक्षम प्राधिकरणाकडून दाखला देण्याची अट आहे. मुरबाड नगरपंचायतचे मुख्याधिकारी मनोज म्हसे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. अंबरनाथ शहरात 1283 फेरीवाले यांची नोंदणी झाली आहे. 2023 ला याबाबतचा सर्व्हे पूर्ण झाला. असल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. नगरपालिकेचे सीईओ समितीचे अध्यक्ष असतात, नगरपदपथ विक्रेता समिती दोन संघटनांच्या सदस्यांची नोंदणी झाली आहे.