जिल्ह्यातील सर्व शाळा ‘स्मार्ट’ करणार

१०० कोटींचा निधी आराखडा तयार करा-खा.श्रीकांत शिंदे

ठाणे: जिल्ह्यातील सर्व शाळा ‘स्मार्ट शाळा’ करण्यासाठी १०० कोटी निधी आराखडा तयार करून कार्यवाही करण्याबाबत खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सूचना दिल्या. जिल्ह्यातील स्मार्ट आरोग्य केंद्र तयार करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज, १५ ऑक्टोबर, २०२५ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे येथे बैठक झाली.

२७ गावातील जिल्हा परिषदेच्या १८ शाळांचे कल्याण-डोंबिवली महापालिकेत समायोजन करण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या या शाळांना स्मार्ट करण्यासाठी आयुक्त आशिष गोयल यांनी विशेष पुढाकार घ्यावा, अशा सुचना यावेळी देण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या १३२९ शाळा असून प्रस्तावित करण्यात आलेल्या सर्व शाळा दुरुस्ती करण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत १२ टक्क्यांनी पटसंख्या वाढ झाली आहे. तसेच दिशा प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर उंचावले आहे. ५७ कोटी ७५ लाख निधी उपलब्ध होता आणि त्याअंतर्गत शाळा दुरुस्ती करण्यात आली असून नाविन्य पुर्ण योजनेचा निधी व जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेचा निधी देखील शाळा दुरुस्तीसाठी तसेच शाळा स्मार्ट तयार करण्यासाठी १०० कोटींचा निधी आराखडा तयार करण्यासाठी सुचना दिल्या.

इ-वेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घ्यावा. मलंगगड, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका तसेच इतर ठाणे जिल्हयातील इतर ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. सेल्फ हेल्प ग्रुपच्या माध्यमातून कार्यवाही करावी, असे श्री.शिंदे यांनी नमूद केले. शहापूर तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी ऍक्शन मोडवर कामकाज करण्यात यावे. स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत कामकाज करताना येणाऱ्या अडचणींवर सविस्तर चर्चा देखील करण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी प्रास्ताविक केले. यावेळी खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती नरेश म्हस्के, खासदार तथा सह अध्यक्ष दिशा समिती सुरेश म्हात्रे, विधानसभा सदस्य डॉ. बालाजी किणीकर, विधानसभा सदस्य कुमार आयलानी, विधानसभा सदस्य राजेश मोरे, विधानसभा सदस्य सुलभा गायकवाड, नवीमुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ.‌ कैलास शिंदे, आयुक्त कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अभिनव गोयल, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका मनिषा आव्हाळे, पोलीस अधीक्षक ठाणे (ग्रामीण) डॉ. डी. एस. स्वामी, आयुक्त भिवंडी निजामपूर महानगरपालिका अनमोल सागर, उप आयुक्त ठाणे महानगरपालिका संदिप माळवी, पोलिस उपायुक्त ठाणे शहर श्रीकांत पाठक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अविनाश फडतरे तसेच संबंधित सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.