कोपरखैरणेत भव्य रॅली काढून केला निषेध
नवी मुंबई : बेलापूर गावातील अक्षदा म्हात्रे हिच्यावर शीळ येथील मंदिरात ८ जुलै रोजी सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून अक्षदा म्हात्रे हिच्या माहेरील गावात बुधवारी ग्रामस्थांनी भव्य रॅली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
अक्षदा म्हात्रे हिच्या हत्येविरोधात बुधवारी कोपरखैरणे गावातील शिवसेना शाखेच्या चौकात कोपरखैरणे गावातील शेकडो नागरिकांनी एकत्रित येऊन तीव्र निषेध व्यक्त केला. घटनेतील नराधमांविरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून घटनेचे स्वरूप व गांभीर्य पाहता त्यांना केवळ फाशीची शिक्षा योग्य आहे, आणि ती झालीच पाहिजे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी या निषेध व्यक्त करण्यासाठी कोपर खैरणे गावातील जेष्ठ नागरिकांपासून ते युवा तरुण , महिला व पीडितेचे नातेवाईक, ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर सदर रॅलीनंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी गावातील रांजण देवी मंदिरात ग्रामस्थ व नवी मुंबईतील सामाजिक संघटनांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती.