मुंबईसाठी अजित पवारांच्या ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

नवाब मलिकांचे भाऊ-बहीण मैदानात
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून उमेदवारांच्या नावांची यादी निश्चित होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आघाडी घेत 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 100 उमेदवारांची यादी जाहीर होईल, अशी माहिती आमदार आणि नवाब मलिक यांच्या कन्या सना मलिक यांनी दिली होती. मात्र, पहिल्या यादीत 37 उमेदवारांना संधी देण्यात आली असून नवाब मलिक यांच्या भावासह कुटुंबातील तिघांना उमेदवारी देण्यात आली आहे. नबाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सुन बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना महापालिकेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा दिला असून उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, उद्यापासूनच या उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटपही केले जाणार आहे. राष्ट्रवादीकडून मुंबई महापालिका निवडणुकांची जबाबदारी नवाब मलिक आणि आमदार सना मलिक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळे, महायुतीपासून फारकत घेत राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे उमेदवार देण्यास सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मलिक कुटुंबातून यंदा तीन जण निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्यात आले आहेत. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक प्रभाग क्रमांक 165, नवाब मलिक यांची बहीण डॉ सईदा खान प्रभाग क्रमांक 168 तर कप्तान मलिक यांची सून बुशरा नदीम मलिक प्रभाग क्रमांक 170 मधून निवडणुक लढणार आहेत. कप्तान मलिक यांचा प्रभाग 168 सध्या महिला राखीव झाल्याने कप्तान मलिक यांच्याकडून सुनेला स्वतः प्रभागात उतरवण्याचा निर्णय तर स्वतः साठी नवीन प्रभाग 165 मधून लढण्याचा निर्णय घेतला आहे.