सिडकोतर्फे मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारण्याची प्रक्रिया सुरू
नवी मुंबई: न्यूयॉर्क येथील मॅडिसन स्व्केअर गार्डन आणि लंडन येथील ओटू अरेना या बहुउद्देशीय नाट्यगृहांपासून प्रेरणा घेऊन देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना नवी मुंबईमध्ये उभारण्यासाठी सिडकोतर्फे स्वारस्य अभिव्यक्ती जारी करून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीतसभा, आंतरराष्ट्रीय क्रीडाविषयक कार्यक्रम, भव्य स्तरावरील सांस्कृतिक महोत्सव आणि आभासी अनुभव यांच्या आयोजनाकरिता 20 हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था आणि 25 हजार उभे प्रेक्षक इतकी क्षमता या ठिकाणी असणार आहे. यामुळे हा देशातील पहिला जागतिक दर्जाचा व भव्य क्षमता असणारा इनडोअर अरेना असणार आहे.
स्वारस्य अभिव्यक्ती दस्तऐवज 9 डिसेंबर 2025 पासून ऑनलाइन उपलब्ध असणार असून निविदा सादर करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. हा उपक्रम केवळ अरेना विकसित करण्यापुरता मर्यादित नसून सांस्कृतिक व आर्थिक चळवळीची ही सुरुवात आहे. या प्रकल्पाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती, पर्यटनाला चालना, नवीन उद्योगांच्या संधींची निर्मिती होणार असून देशातील थेट करमणूक, जागतिक कार्यक्रम आणि आभासी अनुभव प्रदान करणारे अग्रणी शहर म्हणून नवी मुंबईचे देशामध्ये स्थान निर्माण होणार आहे.
नवी मुंबईला जागतिक दर्जाचे करमणूक केंद्र व उत्कृष्ट शहर म्हणून प्रस्थापित करण्याचा सिडकोला सार्थ अभिमान आहे. देशातील पहिला आयकॉनिक मल्टिपर्पज इनडोअर लाईव्ह एन्टरटेनमेन्ट अरेना उभारणीसाठी सुरू करण्यात आलेली प्रक्रिया ही आगामी सांस्कृतिक आणि आर्थिक क्रांतीचा पाया आहे. या प्रकल्पाद्वारे जागतिक दर्जाची करमणूक भारतीयांकरिता खुली होऊन कलाकार, उद्योजक आणि स्थानिक समूहांकरिता व्यापक प्रमाणावर संधी उपलब्ध होणार आहेत व नवी मुंबईचे जागतिक नकाशावरील स्थान अधिक बळकट होणार आहे. प्रत्येक टप्प्यावर कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी असलेली सिडकोची कटिबद्धता अधोरेखित होत आहे, असे मत सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी व्यक्त केले.