भीक मागण्यासाठी मुलांना पळवणारी टोळी जेरबंद
ठाणे : भीक मागण्यासाठी लहान मुलांना पळवणाऱ्या टोळीच्या महात्मा फुले पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून दोन लहान मुलांची सुटका केली आहे. सहा महिन्यानंतर मुले पालकांच्या कुशीत परतली आहेत.
विनोद गोसावी (३६), आकाश गोसावी (२८), अंजली गोसावी (२५) आणि चंदा गोसावी (५५) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अंबरनाथ येथे राहणाऱ्या शर्मिला मिश्रा या त्यांच्या चार मुलांसह ३ मे २०२४ रोजी भुसावळ येथून रेल्वेने अंबरनाथ येथे त्यांच्या राहत्या घरी जाण्यासाठी कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनजवळील बस स्टॅन्ड येथे बसची वाट पाहत होत्या. अचानक त्यांची नऊ आणि सहा वर्षांची दोन मुले अनुक्रमे सुरज आणि सत्यम हे दिसेनासे झाले. त्यांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते त्यांच्या नजरेस पडले नाहीत. त्यामुळे कल्याण येथिल महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा कल्याण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. गुन्हे प्रगटीकरण शाखेचे अंमलदार श्री.मधाळे, पोलिस उपनिरीक्षक किरण भिसे यांनी कल्याण ते भिवंडी, अंबाडी या मार्गांवरील सीसी टीव्ही कॅमेरे तपासून मुले पळवणाऱ्या टोळीतील आरोपीचा माग घेतला. त्यावेळी पालघर येथिल दक्ष नागरिकांनी फोन करून मुले पळवणाऱ्या टोळीतील सदस्यांची माहिती देऊन त्यांना पकडले असल्याचे सांगितले. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कासा येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतले असता कल्याण येथून पळवून नेण्यात आलेले सुरज आणि सत्यम ही दोन मुले त्यांच्याकडे सापडली या दोन मुलांचा वापर ते भीक मागण्यासाठी करत होते, अशी कबुली त्यांनी दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोन्ही मुलांचा ताबा त्यांच्या पालकांना देण्यात आला