भिवंडी-कल्याणपाठोपाठ ठाण्यात धावणार ‘बिनविरोध’ विजयाचा रथ!

९९ उमेदवारांचे अर्ज बाद, २७ जणांची माघार!

ठाणे: कल्याण-डोंबिवलीत बाद अर्ज आणि माघारी यामुळे शिवसेना-भाजपचे नऊ उमेदवार तर भिवंडीत भाजपचा एक उमेदवार बिनविरोध विजयी झाला. विजयाचा हा रथ ठाण्यातही धावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. काही किरकोळ मुद्द्यावरून विरोधी उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याचा आरोप ठाण्यात झाल्यानंतर गुरुवारी संध्याकाळपर्यंत ९९ अर्ज बाद झाले तर २७ अर्ज मागे घेण्यात आले. उद्या माघारीचा शेवटचा दिवस असून यावेळी अनेक अपक्ष माघार घेण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक प्रभागात महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध विजयी होण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे बोलले जात आहे.

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत निवडणूक निर्णायक अधिकाऱ्यांनी काही त्रुटी काढून ११०७ पैकी मनसे आणि अपक्ष अशा ९९ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरवले. तर आज २७ जणांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात तूर्तास ८९१ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून शक्तिशाली उमेदवारांकडून अपक्षांना गळाला लावण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा होणार आहे.

महापालिकेच्या निवडणुकीकरिता १३१ जागांकरिता ११०७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. काल उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली. त्यामध्ये ९९ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले. वागळे इस्टेटमधील प्रभाग १६, १७ आणि १८ मध्ये मनसेच्या उमेदवारासह तीन ते चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. बिनविरोध विजय मिळविण्यासाठी सत्ताधारी हे निवडणूक अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत १२५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच जणांचे अर्ज वैध धरले आणि एक उमेदवाराने माघार घेतली. वर्तकनगरमध्ये १२२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केली होते. त्यामधून १० अर्ज बाद झाले तर एका उमेदवाराने माघार घेतली. लोकमान्य-सावरकर नगरमध्ये १३९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यापैकी आठ अर्ज बाद झाले तर तीन जणांनी माघार घेतली. वागळे इस्टेटमध्ये १०५ जणांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यापैकी १६ जणांचे अर्ज बाद करण्यात आले तर्क चार जणांनी माघार घेतली. नौपाडा-कोपरीमध्ये ९२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १६ अर्ज अवैध ठरवण्यात आले. उथळसरमध्ये ९० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज बाद करण्यात आला तर तीन जणांनी माघार घेतली. कळवा प्रभाग समितीअंतर्गत १४३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २१जणांचे अर्ज बाद झाले तर चार जणांनी माघार घेतली. मुंब्र्यातील प्रभाग २६ आणि ३१मध्ये ८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सात अर्ज बाद झाले आहेत तर चार जणांनी माघार घेतली. प्रभाग ३० आणि ३२मध्ये ७४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यापैकी १० जणांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले तर दोन जणांनी माघार घेतली. दिव्यात प्रभाग २७, २८ मध्ये ६३ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज बाद झाला आहे तर चार जणांनी माघार घेतली आहे. प्रभाग २९, ३३ मध्ये ७२ अर्ज दाखल झाले. त्यापैकी चार अर्ज बाद तर एकाने माघार घेतली. एकूण ११०७ पैकी ९९ अर्ज बाद झाले तर २७ जणांनी माघार घेतली. त्यामुळे गुरुवारी रात्रीपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात ८९१ उमेदवार राहिले आहेत.

ज्या प्रभागात एक किंवा दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्यावर दबाव टाकला जात असून काहींना आमिष दाखविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे उद्या अनेक जण माघार घेण्याची शक्यता असून काही उमेदवार बिनविरोध निवडून येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.