दोन वर्षांत १००हून अधिक बालकांना देश-विदेशात दत्तक

ठाणे जिल्ह्यातून मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण अधिक

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील अनेक बालक विदेशात दत्तक म्हणून दिली आहेत. आतापर्यंत १६ बालकांना विदेशात दत्तक दिले आहे. तर, तात्पुरत्या स्वरूपात १२ मुला-मुलींना दत्तक देण्यात आले आहे. देशातील विविध भागांत ७७ मुला-मुलींना दत्तक देण्यात आले आहे.

ठाणे जिल्ह्यात दोन अनाथाश्रम आहेत. यापैकी एक डोंबिवली आणि दुसरे नेरूळ येथे आहे. येथे दत्तक घेण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. ज्या पालकांना बाळ दत्तक घ्यायचे आहे, त्यांनी आपले नाव नोंदवून सात आवश्यक पुरावे दिल्यावर बाळ दत्तक घेता येते. यात पालकांचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, लग्नाचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, राहण्याचा पुरावा, आधार कार्ड आणि पॅन कार्ड दिल्यावर बाळ दत्तक घेता येते. दत्तक घेण्यासाठी सध्या जवळपास दोन ते अडीच वर्षांचा प्रतिक्षा कालावधी सुरू आहे, अशी माहिती जननी आशिष या सामाजिक संस्थेच्या उपसंचालिका वंदना पाटील यांनी दिली. या दत्तक दिलेल्या मुला-मुलींची काळजी जिल्हा महिला आणि बालकल्याण विकास विभागाकडून घेतली जाते. त्यांची योग्य ती खबरदारी घेतली जात आहे की नाही, यावर सरकारी अंकुश असतो, यासाठी परीक्षण केले जाते.

दत्तक देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सरकारी यंत्रणा आणि सामाजिक संस्थांचा सहभाग असतो. रस्त्यावर बेवारस सापडणाऱ्या बालकांना, अपघातात आई-वडील गमावलेल्या बालकांना सामाजिक संस्थेकडे सांभाळण्यासाठी सोपवले जाते. यानंतर सर्व सरकारी औपचारिकता पूर्ण करून दत्तक देण्याची प्रक्रिया पार पाडण्यात येते. या प्रक्रियेला वेळ लागत असला तरी, अनेक पालक आपल्याला मुलगीच पाहिजे असा हट्ट धरतात, असे ठाणे जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण अधिकारी रेड्डी यांनी सांगितले.

मुलींना आधार देण्याचा प्रयत्न सर्व पालकांचा असतो. अनाथ मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण जास्त आहे. तिसरी मुलगी झाल्यावर अनेक पालक मुलीला सोडून देतात. त्यांना मुलाची अपेक्षा असते. अशा प्रकारामुळे मुलींचे अनाथ होण्याचे प्रमाण जास्त आहे. महिला जेव्हा गर्भपात करण्यासाठी औषध घेतात तेव्हा, मुलाचा गर्भ लवकर पडतो. मात्र, मुलीचा गर्भ पडत नाही, अशी शास्त्रीय माहिती वंदना पाटील यांनी दिली.

मुलींच्या कमी होणाऱ्या संख्येवरून काही वर्षापूर्वी सरकारची डोकेदुखी वाढली होती. यावर सरकारला अनेक कार्यक्रम करून जनजागृती करावी लागली होती. जन्मलेल्या बाळांपैकी 1000 मुलांमागे 870 मुली असा जन्मदर झाला होता. यामुळे सरकारने गर्भ लिंग परीक्षणावर बंदी घातली होती. गर्भपात केंद्रांवर बारीक लक्ष ठेवले जात होते. आता समाजात मुला-मुलींमधील भेदभाव कमी झाला आहे. परिणामी आज मुलींचा जन्मदर जवळपास मुलांइतका झाला आहे.

ठाण्यातील एका कुटुंबाने दत्तक घेतलेल्या मुलीबाबत आपला अनुभव सांगितला. आपल्याला पहिली मुलगी असताना दुसरी मुलगी दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. कारण, नवरा-बायको कामावर गेल्यावर घरी आजी-आजोबा असतात. पहिली मुलगी एकटी पडते. त्यामुळे तिला मुलीचीच सोबत असावी आणि दुसऱ्या मुलीचे संगोपन करण्याचा आनंद दुसऱ्यांदा घेता यावा यासाठी सहा वर्षाच्या मुलीला दत्तक घेतले, असे त्यांनी सांगितले.

ठाणे जिल्हा महिला आणि बालविकास विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मागील दोन वर्षांत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 105 पैकी 61 मुलींना दोन वर्षांत दत्तक घेतले गेले आहे.