ठाण्यात २१ स्कूल बस आणि चार अवैध बसगाड्यांवर कारवाई

प्रादेशिक परिवहन विभाग अ‍ॅक्शन मोडवर

ठाणे: मार्च महिन्यात ठाण्यात अवैध प्रवासी वाहतूक आणि निष्काळजी स्कूल बसचालकांविरोधात कारवाईची मोठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या दोन दिवसांत प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांनी विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या १०० शाळा बसगाड्यांची तपासणी केली. त्यापैकी २१ बसगाड्यांवर दंडात्मक तसेच परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार खाजगी बसगाड्यांवरही कारवाई करण्यात आली आहे.

राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्पष्ट आदेश देत विशेष तपासणी मोहिमेत नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही दया दाखवू नये, असे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे यांच्या पथकांनी शहर व ग्रामीण भागात व्यापक तपासणी सुरू केली आहे.

वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, कोपरी, कळवा, भिवंडी शहर-ग्रामीण तसेच शहापूर परिसरात अचानक तपासणी करून बसगाड्यांची कागदपत्रे, फिटनेस, विमा, परवाने, आपत्कालीन बाहेर पडण्याचे दरवाजे, अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा यांची पडताळणी करण्यात येत आहे.

तपासणीत अनेक बसमध्ये तांत्रिक त्रुटी, अपूर्ण कागदपत्रे, फिटनेस प्रमाणपत्राचा अभाव, तसेच काही ठिकाणी सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळले. शाळांच्या अशा २१ बसगाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. संबंधितांना दंड ठोठावण्याबरोबरच नियमांची तत्काळ पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याच दरम्यान परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक करणाऱ्या चार खाजगी बसगाड्यांवर कारवाई करण्यात आली.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता, अधिकृत प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि कायद्याची अंमलबजावणी यासाठी ही मोहीम महत्वाची आहे. नियम मोडणाऱ्यांना माफी नाही, असे कडक धोरण राबवणार असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली.

राज्य परिवहन मंडळाच्या मार्गावरील बसथांब्यांवर उभ्या असलेल्या प्रवाशांना उचलून एस.टी.च्या मार्गावर बेकायदेशीर स्पर्धा करणाऱ्या बसवरही विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्य परिवहनचे पर्यवेक्षक आणि आरटीओ अधिकारी संयुक्तपणे कारवाई करत आहेत, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी दिली.