भाईंदर- मिरारोड नयानगर परिसरात घडलेल्या मारहाण प्रकरणी एकोणीस संशयितांना पोलिसांनी अटक केली असून सीसीटीव्ही चित्रणाची तपासणी संबंधित हल्लेखोरांवर कारवाई करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी काही आरोपींना ठाणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला असून सदर आरोपीच्या जामिन अर्जाबाबत ३० जानेवारी रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
रविवारी २१ जानेवारी रोजी रात्री १०-३० च्या सुमारास रामलल्ला चे झेंडे लावलेल्या काही दुचाकीस्वार व चार चाकी वाहनांतून प्रवास करणाऱ्या रामभक्तांच्या ताफ्यावर नयानगर परिसरातील आझादनगर जवळ हल्लाबोल करण्यात आला होता. यामध्ये महिलेसह काही पुरुषांना जबर मारहाण करण्यात आली होती तर वाहनांच्या काचा फोडून वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आले होते. नयानगर पोलिसांनी याप्रकरणी सुमारे १९ संशयितांना अटक केली असून कलम ३०७ सह दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणे न्यायालयात तीन एफआयआर नुसार काही आरोपींना हजर करण्यात आले होते. त्यांच्या सुनावणी नंतर हजर आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सदर आरोपींच्या जामीन अर्जावर ३० जानेवारी रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.