१५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांच्या कामांना वेग

* मायक्रोटेक’मुळे रुळांवरील पाण्याचा निचरा लवकर होणार
* खासदार नरेश म्हस्के यांचा पाहणी दौरा

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढवण्यात आल्याने १५ डब्यांची लोकल थांबण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फलाटांवर एक्सलेटर बसविण्याचे काम वेगाने सुरु आहे. साफ आणि स्वच्छ शौचालयगृहेही आता प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. पावसाळ्यात रुळांवर साचण्याऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ‘मायक्रोटेक’द्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम सुरु आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी आज रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा करत विकासकामांचा आढावा घेतला.

खासदार म्हणून निवडून आल्यापासून नरेश म्हस्के यांनी प्रवाशांसाठी ठाणे रेल्वे स्थानकात अधिकाधिक सुविधा देण्यावर भर दिला आहे. अवघ्या एक वर्षाच्या कालावधीत ठाणे स्थानकाचा कायापालट होताना दिसत आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी आणि सूचनेनुसार ठाणे रेल्वे स्थानकात विविध विकासकामे सुरु आहेत. या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी पाहणी दौरा केला.

यावेळी रेल्वेच्या थॉमस (असिस्टंट डिव्हिजनल सिग्नलिंग अँड टेलिकॉम इंजिनिअर), एस.के. सिंग (वरिष्ठ विभाग अभियंता जनरल), राजीव रंजन सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक आणि इतर अधिकारी तसेच शिवसेना पक्ष सचिव विलास जोशी, ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार, सुधीर कोकाटे, भास्कर पाटील, किरण नाकती, प्रकाश पायरे, प्रकाश कोटवाणी आदी उपस्थित होते.

प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन फलाट क्रमांक २, ३ आणि ४ ची लांबी वाढवण्याची मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली होती. ती मंजूर होऊन कामास सुरुवातही झाली आहे. आता हे काम वेगाने सुरु असून १५ डिसेंबरपर्यंत ते मार्गी लागणार आहे. ३१ डिसेंबरपासून या तिनही फलाटांवर १५ डब्यांची लोकल थांबणार आहे. लांबी वाढविल्याने तीन अतिरिक्त डब्यांतून ठाणेकरांना सुखकारक आणि आनंददायी प्रवास करता येणार असल्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले.

फलाट क्रमांक ५ आणि ६ वर एक्सलेटर बसविण्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. आतापर्यंत चार नवीन एक्सलेटर बसविण्यात आले आहेत. एका एक्सलेटरचे काम प्रलंबित असून यावरून खासदार नरेश म्हस्के यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. फलाटावर एक्सलेटरला अडथळा ठरणारे मंदिर स्थलांतरित करून एक्सलेटरचे काम तीन दिवसात सुरु करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. तर फलाट क्रमांक ७, ८, ९ आणि १० वर एक्सलेटर बसविण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना केली आहे. या फलाटांवर एक्सलेटर बसवल्यास लांब पल्ल्याच्या एक्सप्रेसमधून येणाऱ्या वयोवृध्द, लहान मुले, महिलांना सोयीचे होईल. स्वच्छतागृहांसाठी डीमार्टशी करार करण्यात आला असून खासदार नरेश म्हस्के यांनी भ्रमणध्वनीद्वारे त्यांच्याशी संवाद साधत स्वच्छ, निगा, देखभाल बाबत सूचना केल्या.

पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साठते आणि लोकलचा वेग मंदावतो. यासाठी ‘मायक्रोटेक’द्वारे भूमिगत वाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र पावसाळ्यात हे काम बंद होते. आता हे काम सुरू झाले असून डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होणार आहे.