सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
मुंबई: मुंबईतील शिवालय येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. या बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, सतेज पाटील, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, अनिल परब, आणि अमिन पटेल उपस्थित होते. मात्र या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकही नेता उपस्थित राहिलेला नाही. त्यामुळे शरद पवारांचा पक्ष महाविकास आघाडीपासून दूर आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकही नेता उपस्थित नसल्याच्या चर्चेवर शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, राष्ट्रवादी पक्षाचे दोन नेते पोहचले आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इतर नेतेही थोड्याच वेळात पोहोचतील. त्यांच्या काही घरगुती कारणास्तव आणि कम्युनिकेशन गॅपमुळे थोडा उशीर झाला. मात्र आम्ही सर्व एकत्रच आहोत.
सत्ताधाऱ्यांच्या चहापानावर आम्ही बहिष्कार टाकत आहोत. प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे सरकार मस्तीत आहे, त्यांना त्याचा माज आहे. मुख्यमंत्र्यांच्या आमंत्रणाला आम्ही जाणार नाही, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार अशी प्रथा पडलीय असं काहींना वाटेल. मात्र तसं नाहीये. सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचं आणि संविधानाला अनुसरून वागणूक मिळत नाहीये. खरं तर आम्ही सत्ताधाऱ्यांचा चहा प्यायला जात नसतो तर सरकारी तिजोरीतील पैशातून चहा प्यायला जात असतो. लोकशाही मार्गाने हे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे अंग आहे. मात्र सरकारला मोठ बहुमत मिळाले आहे, त्यामुळे ते विरोधकांचा सन्मान राखत नाहीत. म्हणून आम्ही या चहापाण्यावर बहिष्कार टाकत असल्याचे शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आपले कणखर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा घात आहे की अपघात आहे, हे अद्याप कळू शकलेलं नाही. त्यामुळे आम्ही चहापानाला जात नाही आहे. पिकविमा बंद करण्यात आला आहे. राज्यात उडता पंजाबसारखी परिस्थिती झाली आहे. एका मंत्र्याच्या गावात ड्रग्ज सापडलेत. एकीकडे आम्हाला चहा पाजायचा आणि दुसरीकडे तरुण पिढीला ड्रग्ज देतात म्हणुन आम्हाला चहा प्यायचा नाही. डान्सबारवरती रेड होते, त्यात अनेक महिला सापडतात. लाडकी बहिण योजनेमुळे कर्ज बाजारी झालो हे सांगुन अनेक महिलांचा लाभ बंद केला. सभापती किंवा अध्यक्ष कधीही पक्षाच्या कार्यक्रमाला जात नाहीत, मात्र अध्यक्ष पक्षाचा दुपट्टा घालून प्रचार करतात, असे आरोपही भास्कर जाधव यांनी केले. अध्यक्ष जमीन गरिबांना द्यायला गेले होते की हडप करायला गेले होते? हे कळत नाही असेही ते म्हणाले.