सरकारी जमिनीवर कोणी अतिक्रमण करीत असेल तर तसे करणार्याची आरती करायची असते काय, असा रोखठोक सवाल करुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यावर होत असलेल्या ‘बुलडोझर बाबा’ या टीकेस चोख उत्तर दिले. धडाडीचे आणि साहसी असे त्यांचे वर्णन होत असते आणि त्यामुळे त्यांनी केलेल्या वरील विधानामुळे आश्चर्य वाटू नये. श्री. योगी असे नाही बोलणार तर कोण बोलणार असा प्रतिवाद त्यांच्या या शैलीवर भाळणारे त्यांचे अनुयायी करतील. ज्यांना खरोखरच बेकायदा कामाबद्दल चिड आहे, त्यांनी कारवाईचा बडगा तातडीने उचलायलाच हवा, असे जनतेला वाटत असते. अर्थात देशात फार कमी नेते या अपेक्षेला उतरतात. श्री. योगी हे त्यापैकी एक आहेत.
भाजपाच्या दुसऱ्या पिढीतील नेत्यांपैकी योगी हे प्रमुख मानले जातात. त्यांची कार्यशैली तसेच जीवनशैली पहाता त्यांच्याकडे भविष्यात देशाचे नेतृत्व सोपले जाईल काय अशी चर्चाही अधूनमधून सुरु असते. यदाकदाचित अशी बेधडक माणसे देशाचे सर्वोच्च नेते झाले तर राजकारणाचे गुन्हेगारीकरण असलेले गूळपीठ संपेल काय? या प्रश्नात भारतीय समाजाचा आशावाद लपला आहे. परंतु तो चव्हाट्यावर तेव्हाच येईल जेव्हा सर्वसामान्य जनताही कायद्याच्या चौकटीत वावरु लागेल. या आशावादास मान्यता मिळावी यासाठी सारेच उत्सुकही आहेत. परंतु त्यासाठी जी सचोटी दाखवणे अपेक्षित आहे ती खचितच दाखवली जात नसते. त्यासाठी परिस्थितीवर तर कधी ‘सिस्टिम’वर खापर फोडले जाते. सर्वसामान्य माणसांकडून या दोन्ही बाबी की ज्या त्यांच्या नियंत्रणात नाहीत, त्या बदलल्याशिवाय कायद्याला अधिन राहून शिस्तीची अपेक्षा कशा काय धरता येईल.
सरकारी जमीन बळकावणे, त्यावर बांधकाम करणे आणि मग त्यांची विक्री करुन कोट्यवधी रुपये कमवणे हा राजकीय मंडळींचा डाव्या हाताचा मळ बनला आहे. या पैशातूनच त्यांची राजकीय कारकीर्द उभी रहात असते. नेतेपद टिकविण्यासाठी आणि त्यात पदे मिळवण्यासाठी शक्ती वाढवणारे एक पर्यावरण नेतेमंडळी करीत असतात. श्री. योगी यांनी या सर्वपक्षीय पद्धतीला विरोध केला आहे. परंतु त्यांच्याच पक्षातील किती लोक त्यांचे अनुकरण करण्याचे धाडस करुन दाखवू शकतील? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक असते. प्रत्येक भाजपा नेता ‘योगी’ होऊ शकत नाही. त्यामुळे अपवादात्मक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पहावे लागेल. एरवी बेकायदा कामे करणाऱ्यांची आरती करण्याची रीत जिथे रुजली आहे तिथे फार स्वच्छ कारभाराची अपेक्षा कशी ठेवता येईल? श्री. योगी त्यांच्या परीने एक आदर्श नेता होण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचे स्वागतच करायला हवे.