पालघरच्या १४ वर्षाच्या प्रणयचे भगिरथी प्रयत्न यशस्वी
पालघर: घरोघरी नळ नसल्याने आजही अनेकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. दुर्गम भागात हे नेहमीचं चित्र आहे. पाण्यासाठी आईची होणारी वणवण बघवत नसल्याने पालघरमधील केळवे धावंगेपाडा येथील मुलाने घराच्या आवारात विहीर खोदली आहे. या मुलाचे वय अवघे 14 वर्ष आहे.
पालघरमधील केळवेमधील धावांगेपाड्यातील सालकर दांपत्य राहत आहे. दर्शना आणि रमेश हे दोन्ही पती-पत्नी बागायतदार वाडीत मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मोलमजुरी करून संध्याकाळी घरी परतल्यावर दर्शना यांना आपल्या कुटुंबासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. मात्र आईची ही पाण्यासाठी रोजची होणारी धावपळ मुलगा प्रणय याला पाहवत नव्हती. शेवटी आठवीत शिकणाऱ्या अवघ्या 14 वर्षाच्या प्रणयने आपल्या घराच्या आवारातच विहीर खोदण्याचा निर्णय घेतला.
ठरल्याप्रमाणे प्रणयने घराच्या आवारातच विहिरीचं खोदकाम करण्यास सुरुवात केली. घरातील शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांचा वापर त्यासाठी केला. प्रणयने चार दिवसात18 फुटांपेक्षाही जास्त खोल विहीर खोदली. अखेर या विहिरीला 18 फूटानंतर पिण्यायोग्य पाणी लागलं आणि प्रणयच्या भगिरथी प्रयत्नांना यश मिळाले.
प्रणयने केलेली जिद्द , हिम्मत आणि मेहनत यांच्या जोरावर आपल्या आईचा पाण्यासाठी होणारा त्रास कमी केला. या सगळ्यामुळे चिमुकल्या प्रणयवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. प्रणयने केलेल्या या कामाचे त्याच्या आई-वडिलांना कौतुक आहे. पाण्यासाठी होणारी पायपीट आपली कमी झाल्याने प्रणयची आई दर्शना यांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.
आईची पाण्यासाठी होणारी धगधग पाहून प्रणयने 18 फुटांचा खोल खड्डा खोदला. या प्रयत्नाने विहिर झाल्याने त्याने आपल्या आईचा त्रास कमी केला. प्रणयने केलेली ही गोष्ट जगावेगळी नाही. मात्र, त्याने दाखवलेली हिम्मत आणि मेहनतीचं आज सर्वत्र कौतुक केलं जातं आहे. विहिरीला पाणी लागेल की नाही हा विचार प्रणयने केला नाही. पण, आपल्या आईचा त्रास कमी करण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. याचेच कौतुक अधिक केले जात आहे.