वालावलकर रुग्णालयाच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : घणसोली येथे राहणाऱ्या चिन्मय जाधव या नऊ महिन्यांच्या चिमुकल्याला चिपळूणमध्ये विषारी मण्यार चावले. त्यामुळे तो सुमारे २० दिवस बेशुद्धावस्थेत होता. मात्र येथील वालावलकर रुग्णालयातील डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करून त्याचे प्राण वाचवले.
चिन्मयच्या पालकांनी गणपती उत्सवासाठी त्याला चिपळूण तालुक्यातील दुर्गवाडी येथे आणले होते. मात्र, ७ सप्टेंबरला चिन्मयच्या गळ्याला मण्यार या अत्यंत विषारी सापाने चावा घेतला. त्यामुळे ते बाळ पूर्णपणे बेशुद्ध झाले. श्वासही थांबला, आणि त्याच्या हातपायामधील ताकद पूर्णपणे गेली. बाळाला तातडीने भ. क. ल. वालावलकर रुग्णालयात आणण्यात आले. अशा बेशुद्ध अवस्थेत वालावलकर रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. कृत्रिम श्वास देण्याकरता व्हेंटिलेटर लावण्यात आला.
पनवेलहून खास मार्गदर्शन करणारे डॉ. महेश मोहिते आणि वालावलकर रुग्णालयाचे डॉ.अनिल कुरणे, डॉ. शिवाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू केले. अनेक दिवस बाळ निपचित होते. शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. जिवंतपणाचे लक्षण म्हणजे डोळ्याच्या बाहुल्याची हालचाल ती सुद्धा होत नव्हती. असे अनेक दिवसांपासून मुलाची प्रकृती गंभीर होत होती. भारत सीरमच्या अँटी स्नेक व्हेनमच्या एकूण ३० कुप्या देण्यात आल्या होत्या. तरीही सुधारणा दिसेना. शेवटी डॉक्टरांनी सुद्धा आशा सोडली. पण ‘देव तारी त्याला कोण मारी’ म्हणून दहाव्या दिवशी बाळाने डोळे उघडले. हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत हात हलवू लागले आणि आपल्या आईला सुद्धा ओळखू लागले. जवळजवळ पाऊण महिना हे बाळ मृत्यू शय्येवर होते. पण बाळाला व्हेंटिलेटर असताना इन्फेक्शन होऊ नये, पाठीला जखमा होऊ नयेत याची पूर्ण जबाबदारी बालरोग तज्ज्ञांनी समर्थपणे पेलली. बाळाचा संपूर्ण खर्च हा महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत पूर्णतः मोफत करण्यात आला. त्यांच्या आई-वडिलांनी रुग्णालयाचे शतशः आभार मानले आहेत.
रुग्णालयातील बालरोग विभागातील नर्सिंग स्टाफ आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. गौरी परब, डॉ. प्रचेता गुप्ता, डॉ. मोहित कडू, डॉ. सलोनी शाह, डॉ. पंक्ती मेहता, डॉ. तनीषा सोमकुवर यांनी विशेष सेवा देऊन बाळाचा जीव जीव वाचवला. याबद्दल रुग्णालय प्रशासनाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.