अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी गायकवाड यांची माहिती
अंबरनाथ: अंबरनाथ नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीत एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेलेली नावे ही केवळ तांत्रिक चूक असून ती दुरुस्त करण्यात आल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे. सुधारणा केलेली ही नवी यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. या यादीबाबत प्राप्त हरकती आणि सूचना लक्षात घेता स्थळ पाहणीद्वारे योग्य त्या सुधारणा करण्यासाठी ऑब्जेक्शन कंट्रोल चार्ट तयार करण्यात आला. हा चार्ट अपलोड करताना तांत्रिक अडचणी व विसंगतींमुळे काही नोंदींचे ओव्हरलॅपिंग होऊन चुकीच्या पद्धतीने माहिती नोंदवली गेली. त्यामुळे प्रभागनिहाय मतदार मोठ्या प्रमाणात यादीत बदल झाल्याचे निदर्शनास आल्याचे मुख्याधिकाऱ्यानी सांगितले.
मतदार यादीतील तांत्रिक त्रुटींच्या पूर्तता करून आवश्यक सुधारणा करून अचूक अंतिम मतदार यादी दुरुस्तीसह नागरिकांना लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार असून लवकरच ही सुधारित अंतिम यादी अपलोड केली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांनी दिली आहे.