कर न भरल्यास झोपडी जप्तीची कडोंमपाने दिली नोटीस
कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेने एका आदिवासी कातकरी महिलेच्या झोपडीला तब्बल दोन लाख 33 हजारांचा कर लावला असून हा कर न भरल्यास झोपडी जप्तीची नोटीस या महिलेला देण्यात आली आहे. याबाबत श्रमजीवी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 10 गणेश विद्यालय हायस्कूलजवळील कातकरी पाडा येथील आदिवासी कातकरी समाजातील विधवा महिला सुमित्रा उर्फ पारू कातकरी या महिलेला ती राहत असलेल्या झोपडीचे सुमारे दोन लाख ३३ हजार रुपये रकमेचे कराचे बिल महानगरपालिकेने दिलेले आहे. हा कर भरला नाही तर ती राहत असलेली झोपडी जप्त करण्यात येईल अशी नोटीसही बजावण्यात आली आहे.
ही महिला विधवा कातकरी समाजाची असून घरामध्ये कोणताही करता पुरुष नसताना तिला प्राप्त झालेल्या दोन लाख 33 हजारांची नोटीस पाहता तिच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे. तिचे घर विक्री करून पाच हजार सुद्धा मिळणार नाहीत. अशा परिस्थितीत या महिलेला नोटीस काढून आदिवासी कातकरी कुटुंबांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चेष्टा केलेली आहे.
या घटनेचा श्रमजीवी संघटनेने निषेध करून महिलेच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी सांगितले. याबाबत कर विभागाचे उपायुक्त कांचन गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.