कल्याण: इंडोनेशियामधील बाली येथे पर्यटनासाठी शहरात शैक्षणिक सहल घेऊन गेलेल्या कल्याणच्या शाळेतील शिक्षिका श्वेता पाठक रिव्हर राफ्टींग दरम्यान बोट उलटल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
सध्या पाठक यांचे नातेवाईक आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी बाली येथे रवाना झाले असून त्यांच्या नातेवाईकांनी परदेश मंत्रालयाला श्वेता यांचा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.
कल्याणच्या बिर्ला शाळेची सहल इंडोनेशिया-बाली इथे गेली होती. ९ मे रोजी रिव्हर राफ्टींग करताना श्वेता प्रवास करत असलेली बोट बुडाली. दरम्यान या दुर्घटनेत श्वेता यांचा मृत्यू झाला असून त्यांचे नातेवाईक तसेच शाळा प्रशासनाचे कर्मचारी बाली येथे रवाना झाले आहेत. श्वेता यांचा मृतदेह बालीमधील गैण्यार शहरातील पायांगण रुग्णालयात ठेवण्यात आला असून हा मृतदेह भारतात आणण्यासाठी मदतीचे आवाहन नातेवाईकांनी केले आहे.
दरम्यान याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांना ट्वीट करत मदतीचे आवाहन केले आहे. या घटनेबाबत या संदर्भात बिर्ला शाळेच्या प्रिन्सिपॉल रंजना यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्याही बालीला शैक्षणिक सहलीसाठी आमच्यासोबत त्याही गेल्या होत्या, असे सांगितले. या घटनेबाबत आम्ही काहीच बोलू शकत नाही असे सांगतले. या घटनेमुळे कल्याणात दुःखाचे सावट पसरले आहे.