नौपाडा भागातील अनधिकृत बांधकामे अतिक्रमणे आणि फेरीवाल्यांवर होणार कारवाई
ठाणे : नगरसेवक निधीतून बांधलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा तोडल्याने महापालिकेने विकासकावर गुन्हा दाखल करावा तसेच नौपाडा परिसरात झालेली अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा फेरीवाले यांच्या तत्काळ कारवाई करण्याची मागणी भाजपच्या माजी नगरसेवकांनी आयुक्तांना पत्राद्वारे केली.
भाजपचे माजी नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी आज ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.सौरभ राव यांची भेट घेत नौपाडा विभागातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि बेकायदा फेरीवाले यांच्यावर कारवाई करण्यासाठी निवेदन दिले. यावेळी भाजपच्या महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या.
भास्कर कॉलनी, सेवा रस्ता येथील नगरसेवक निधीतून बांधण्यात आलेला ज्येष्ठ नागरिक कट्टा एका विकासकाने महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता तोडल्याने त्याच्यावर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आयुक्तांनी या सकारात्मक प्रतिसाद देत गुन्हा दाखल करणार असल्याचे आश्वासन दिले. गावदेवी येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा देखील संबंधित लाभार्थ्याने तोडल्याचे असून त्याच्यावरही कारवाई करण्याची मागणी सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांनी केली. भक्तिमंदीर, भास्कर कॉलनी आणि घंटाळी भागात अनधिकृत बांधकामे झाली असून त्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच राम मारुती रोड, गोखले रोड येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना चालण्यास रस्ता मिळत नसल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी फेरीवाल्यांवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले.