भाईंदर: मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ-1 मधील चोरीच्या घटनांची उकल केली तसेच मॅक्सस मॉल, भाईंदर पश्चिम येथे झालेल्या कार्यक्रमात जप्त केलेला सर्व माल मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात आला.
पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांच्या उपस्थितीत नवघर पोलीस स्टेशन, काशिमीरा पोलीस स्टेशन, भाईंदर पश्चिम पोलीस स्टेशन, नया नगर पोलीस स्टेशन, उत्तन पोलीस स्टेशन यांच्या हद्दीत परिमंडळ-1 अंतर्गत चोरी व चकमकीचे विविध प्रकार एकाचवेळी उघडकीस आले. पोलिसांनी रोख रक्कम, सोने आणि चांदी जप्त केली. दागिने, ऑटोरिक्षा, मोबाईल, कार असा एकूण एक करोड 86 लाख 38 हजार 570 रुपयांचा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला.
सर्वसामान्य नागरिकांनी घरात जास्त रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने ठेवू नये, ते ठेवण्यासाठी बँक आणि लॉकरची मदत घ्या, असे आवाहन पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी केले.
व्हॉट्सअॅपवर अनपेक्षित ईमेल आणि मेसेजवर तुमचा तपशील शेअर करू नका, सामान्य नागरिकांनी क्रिप्टो करन्सीसारख्या घोटाळ्यांपासून सावध राहावे, असेही त्यांनी सांगितले. चोरीस गेलेला ऐवज परत मिळाल्याने उपस्थितांनी पोलिसांचे आभार मानले. पोलिस आयुक्त मधुकर पांडे, परिमंडळ-1 चे पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.