मिरचीचा ठसका

आवक घातल्याने दरात वाढ होणार

नवी मुंबई: वाशीतील एपीएमसी मसाला बाजारात सध्या मिरचीची आवक घटली आहे. आवक घटली असली तरी मागणी कायम असल्याने बाजारात मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मसाल्यांसाठी लागणाऱ्या मिरचीची मागणी वाढत असून पुरवठा तुलनेत कमी पडत आहे.

वाशी एपीएमसी मार्केट येथे दररोज विविध राज्यांमधून मिरचीची आवक होत असते. मात्र हवामानातील बदल, पिकावर झालेला परिणाम आणि गतवर्षी भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक कमी घेतल्यामुळे आवक काही प्रमाणात कमी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात लाल तिखट मसाला बनविला जातो यामुळे किरकोळ तसेच घाऊक बाजारात मिरचीचे दर वाढण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

काही व्यापाऱ्यांच्या मते, घरगुती मसाल्याला बाजारातील तयार मसाल्यांपेक्षा अधिक शुद्धता आणि चव असल्याने अनेक कुटुंबे अजूनही पारंपरिक पद्धतीचा अवलंब करत आहेत. त्यामुळे सध्या गावोगावी आणि शहरांमध्येही “मसाला बनविण्याचा हंगामाला जोर धरू लागला आहे.
ग्राहकांना मात्र वाढत्या दरांचा फटका बसण्याची शक्यता असून स्वयंपाकघरातील ‘मिरचीचा ठसका’ महागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. सध्या महिलांची मसाला बनविण्यासाठी लगबग सुरु झाली आहे.

गुढीपाडव्यानंतर जत्रोत्सव, लग्नसराई तसेच आगामी पावसाळा लक्षात घेता उन्हाळ्याच्या दिवसात घराघरांत मसाला तयार करण्याची लगबग सुरू झाली आहे. पारंपरिक चवीचा आस्वाद वर्षभर मिळावा यासाठी महिला सध्या मसाला बनविण्यात व्यस्त झाल्या आहेत. मात्र मिरच्यांचे दर हे गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुप्पट वाढले आहेत. लाल मिरची, धणे, जिरे, काळी मिरी, हळद अशा विविध मसाल्याच्या पदार्थांची खरेदी बाजारातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागात घरगुती मसाल्याला अधिक मागणी असून, प्रत्येक घराची चव वेगळी असल्याने खास रेसिपीनुसार मसाला तयार केला जातो.

मिरचीचे दर (प्रति किलो): लवंगी २६० रुपये, बेडगी ४८० रुपये, काश्मिरी ७२० रुपये, संकेश्वरी साधी ३६० रुपये, संकेश्वरी अस्सल एक हजार रुपये

गत वर्षीपेक्षा यंदा शेतकऱ्यांनी मिरचीचे पीक कमी घेतले. गेल्यावर्षी भाव कमी मिळाले होते. यंदा मात्र मिरचीची मागणी वाढली आहे. पण आवक कमी असल्याने दर आपसूकच वाढले आहेत. जर परिस्थिती अशीच राहिली तर येत्या काही दिवसांत मिरचीचे दर आणखीन वाढण्याची शक्यता आहे, असे जय महाराष्ट्र मसाले व्यापारी निखिल बोटे यांनी सांगितले.