भाईंदर: भाईंदर पूर्वेस आग लागून ४० च्या वर झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. दुर्घटनेत बेघर झालेल्यांना एमएमआरडीएच्या घरात आश्रय देण्याबाबत आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत मागणी केली असतानाही महापालिकेचे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग अधिकारी नरेंद्र चव्हाण यांनी प्रभाग अधिकाऱ्यांसह अवैध बांधकाम विरोधात कारवाई करुन सुमारे ४० बांधकामे उद्ध्वस्त केली.
गोल्डन नेस्ट परिसरातील आरक्षित भूखंडावर मागील अनेक वर्षांपासून अनधिकृत निवासी व अनिवासी बांधकामे करण्यात आली असून निवासी बांधकामामध्ये अनेक गोरगरीब कुटुंबे वास्तव्य करीत होती. मागील आठवड्यात बुधवारी लागलेल्या आगीत सुमारे ४० हून अधिक निवासी घरे जळून खाक झाली होती. या बेघर कुटुंबियांना एमएमआरडीएच्या घरात आश्रय देण्याची मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत केल्याने बेघर झालेल्यांना आसरा मिळण्याची आशा होती. मात्र मंगळवारी दुपारपासून सुरू झालेल्या महापालिका तोडक कारवाईमुळे आग दुर्घटनेतील बचावलेल्या घरांवर बुलडोझर चालविल्याने येथे वास्तव्य करीत असलेल्यांच्या नशिबी बेघर होण्याची वेळ ओढवली आहे.