ठाणे: ठाण्यातील वागळे परिसरातील मे.वेंकटरमना फूड प्रोडकट या कंपनीमध्ये बुधवारी दुपारी ४ वाजता भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीमध्ये १० सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला.
स्फोटाच्या हादऱ्याने बाजूला असलेल्या झोपड्यांवरील पत्रे देखील उडाले. तर या परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरल्याने नागरिक देखील भयभीत झाले. या कंपनीमध्ये विविध प्रकारच्या चिप्स तयार केल्या जात होत्या. दुपारी लागलेली आग रात्री उशिरापर्यंत सुरु होती. तर आग विझवण्यासाठी ठाणे महापालिकेबरोबरच कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि भिवंडी अग्निशमन दलाकडून देखील शर्थीचे प्रयत्न सुरु होते. गांधी जयंतीची सुट्टी असल्याने सुदैवाने कंपनीत कामगार नसल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
हनुमाननगर येथील रोड क्रमांक ३४ येथील शिवसेना शाखेजवळ मे.वेंकटरमना फूड स्पेशालिटीज लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये पाकिटबंद खाद्य पदार्थ तयार केले जातात. बुधवारी महात्मा गांधी जयंती असल्याने कंपनीतील कर्मचारी कामावर आले नव्हते. बुधवारी दुपारी ४च्या सुमारास अचानक कंपनीला आग लागली. अवघ्या काही मिनिटांमध्ये आगीने रौद्ररुप धारण केले. मोठ्या प्रमाणात धुराचे लोट निर्माण झाले होते. कंपनीच्या परिसरात लोकवस्ती आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान, बचाव पथके घटनास्तळी दाखल झाले. कंपनीमध्ये ३० ते ४० सिलिंडर होते. यापैकी १० सिलेंडरचा स्फोट झाला. तर इतर सिलेंडर बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आल्याने मोठे नुकसान टळले आहे.
आग एवढी भीषण होती कि, ही आग विझवण्यासाठी ठाणे अग्निशमन विभागाचे १० आगीचे बंब, १० वॉटर टँकर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची टीम घटनास्थळी होती. तर आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मीरा-भाईंदर,कल्याण-डोंबिवली आणि भिवंडी महापालिकेच्या अग्निशन दलाला देखील पाचारण करण्यात आले. दरम्यान तीनही महापालिकांच्या अग्निशमन विभागाकडून रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
कंपनी जुनी असून तेथील दुरुस्तीची कामे करणे गरजेचे होते. त्याकडे दुर्लक्ष होत असतांना ही आग लागली. त्यामुळे आग लागली की जाणूनबुजून लावण्यात आली, अशी शंका नागरिक उपस्थित करत आहेत. कंपनीची आणि घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाचे सदस्य बबलू दादूभाई शेख यांनी केली आहे.