झाड पडून मृत्यु झालेल्या वकिलाच्या पत्नीला न्याय मिळेना

ठाणे: काही वर्षांपूर्वी झाड पडून मृत्यु पावलेल्या वकिलाच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही. पीडित महिलेला ठाणे महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आठ वर्षांनंतरही पालिकेचा प्रस्ताव धूळखात पडून आहे.

ठाणे महापालिकेच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या धर्मवीर मार्गावर २०१७ मध्ये किशोर पवार या तरुण वकिलाचा अंगावर झाड पडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. किशोर पवार यांच्या मृत्यूमुळे ठाणे महापालिकेला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणी महासभेत वृक्ष प्राधिकरण विभागावर जोरदार टीका झाल्यानंतर पवार यांच्या कुटुंबीयांना आर्थिक सहाय्य देण्याच्या दृष्टिकोनातून महासभेत ठराव करण्यात आला. किशोर पवार यांची पत्नी प्रिती पवार यांना महापालिकेच्या आस्थापनेवर विशेष बाब म्हणून लिपिक पदावर नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले.

सद्या प्रिती पवार या पाणी पुरवठा विभागात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून काम करीत असून त्यांना ठेकेदाराकडून मानधन दिले जात आहे. किशोर पवार यांच्या पश्चात वयोवृद्ध वडील उमाजी पवार, आई सुनीता पवार, पत्नी प्रिती पवार आणि मुलगा लोकेश पवार असा परिवार आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी पत्नी प्रीती पवार यांच्यावर असून सध्या उत्पन्नाचे कोणतेही साधन नसल्याने कुटुंबावर उपासमारीचे वेळ आली आहे. सासू-सासरे यांच्या औषध उपचार तसेच मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवणे अत्यंत अवघड झाले असल्याने प्रिती पवार न्यायाची अपेक्षा करत आहेत.