मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटींची मदत जाहीर
मुंबई: शिर्डीच्या साईबाबा संस्थानने आपल्या सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण दाखवून संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या निधीचा वापर राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीवर तातडीने मदत पुरवण्यासाठी केला जाणार आहे.
महाराष्ट्रात सर्वत्र सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून, अनेक ठिकाणी ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका मराठवाडा विभागाला बसला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्व मंत्र्यांना दुष्काळी भागांचे दौरे करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. बळीराजाच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था मदतीचा हात देत आहेत. आता शिर्डीच्या साईबाबा संस्थानने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती असताना, धुळे जिल्ह्यातील 50 पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या पगारातून दोन लाख रुपये गोळा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी चेक सुपूर्त केला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हा चेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला आहे.