अग्निशमन दलातील भरती प्रकिया लवकरच पूर्ण होणार
नवी मुंबई : नवी मुंबईतील कळवा ते नेरूळ अशा ५३९ .२५ हेक्टर वर औद्योगिक वसाहत वसली असून यात चार हजार उद्योग आहेत. परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत आहेत. मात्र अशी आपत्तीजनक स्थिती हाताळण्यासाठी लागणारे मनुष्यबळ एमआयडीसी अग्निशमन दलाकडे अपुरे आहे. यासाठी लवकरच भरती प्रक्रिया करण्यात येणार आहे.
एमआयडीसी भागात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरू असून यामध्ये रासायनिक कंपन्या देखील मोठ्या संख्येने आहे. या भागात नेहमीच आगीच्या घटना घडत असतात. त्यावर नियंत्रण मिळावे म्हणून एमआयडीसीने औद्योगिक वसाहतींकरिता तुर्भे, पावणे आणि रबाळे अशा तीन अग्निशमन दलाची उभारणी केली आहे. यातील पावणे अग्निशमन केंद्र ठाणे-बेलापूर असोसिएशनतर्फे चालवले जात असून त्यास एमआयडीसी अनुदान देते.
तिन्ही केंद्रात अवघे ४७ कर्मचारी तैनात आहेत. यात तुर्भे १३, पावणे १६ आणि रबाळे येथे १८ कर्मचारी कार्यरत आहेत. या ठिकणी एकूण नऊ वाहने उपलब्ध आहेत, मात्र त्यासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र अल्प आहे. प्रत्येक वाहनावर सहा कर्मचारी असणे गरजेचे आहे तसेच वाहनचालकांची सुद्धा कमतरता आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना आठ तासाची पाळी करून सोळा तास सजग राहावे लागते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर देखील कामाचा मोठा ताण पडत आहे.
औद्योगिक भागात एखादी आगीची मोठी घटना घडली तर हे अग्निशमन दल अपुरे पडत आहे. त्यामुळे अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांवरील पडणारा ताण कमी करण्यासाठी एमआयडीसीने एकूण २२१ जणांची भरती प्रकिया राबवली आहे. ही प्रकिया अंतिम टप्प्यात असून आवश्यक केंद्रांना मनुष्य पुरवठा केला जाणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या एमएमआर क्षेत्रातील एकंदरीत अग्निशमन दलातील अपुऱ्या कर्मचाऱ्याची संख्या पाहता महाऑनलाईनमार्फत भरती प्रकिया राबवण्यात आली आहे. सध्या आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. त्यांनतर पात्र उमेद्वारांच्या लेखी परीक्षा, मुलाखती, शारीरिक चाचणी वैद्यकीय चाचणी पार पाडली जाईल. त्यानंतर पात्र झालेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून केंद्र निहाय कर्मचारी दिले जातील, अशी माहिती सहाय्यक केंद्र प्रमुख मिलिंद ओगले यांनी दिली.