आनंद कांबळे/ठाणे
ठाणे महापालिका निवडणुकीत माजिवडा-मानपाडा प्रभागातील प्रभाग रचनेवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता असून नवीन ठाण्यात महायुतीतील घटक पक्षच एकमेकांच्या समोर उभे राहणार असल्याने या परिसरात बंडखोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महापालिकेच्या प्रभाग रचनेवर अंतिम मोहर पुढील महिन्यात उमटेल परंतु सुशिक्षित आणि नवीन मतदार असलेल्या या नवीन ठाण्यात म्हणजे माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये प्रभाग क्र १, २, ३ आणि ८ यांचा समावेश आहे. त्यामध्ये माजिवडा, बाळकूम, मानपाडा, कोलशेत, हायलँड, कावेसर, वाघबीळ या गावांचा समावेश आहे तर लोढा, हिरानंदानी, विजय नगरी, दोस्ती, रुणवाल यासारख्या नवीन मोठमोठ्या गृह संकुलांचा आणि मानपाडा, आझाद नगरसारख्या मोठ्या झोपडपट्ट्यांचा समावेश आहे. सुशिक्षित मतदार आणि ग्रामस्थ तसेच इतर भाषिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असलेल्या या भागातील विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार संजय केळकर आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे नेतृत्व करत आहेत. मागील वेळी या प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व होते. १६ सदस्य असलेल्या या प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे १४ आणि भाजपचे दोन सदस्य आहेत. या प्रभाग समितीमधील प्रभाग रचना तयार करताना शिवसेना शिंदे गटाला निवडणुकीत फायदा होईल, अशा प्रकारे प्रभाग तीन, आठ आणि दोनची रचना केल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी करून त्या विरोधात निवडणूक आयोगाकडे हरकत घेतली आहे. या दोन प्रभागांवरून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या भागातील नागरी समस्या सोडविण्यासाठी आमदार केळकर हे शिवसेनेच्या भागातील नगरसेवकांना शह देतात त्यामुळे आधीच त्यांच्यात शीतयुद्ध सुरु असताना प्रभाग रचना करताना शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या प्रभागांना झुकते माप दिल्याने भाजपा आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आत्तापासूनच वाद सुरु झाले आहेत.
निवडणुकीत नवीन सुशिक्षित मतदार कोणती भूमिका घेतात तसेच शिवसेना-भाजपा युती होते कि नाही यावर महायुतीचे भवितव्य अवलंबून आहे.