ठाणे: सरकारी कार्यालय म्हणजे धूळखात पडलेल्या फायली, निर्जीव भिंती आणि कळकट वातावरण… पण ठाण्यातील जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील या प्रतिमेला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यालयाच्या छतावर साकारलेली एक सुंदर, सजीव आणि नावीन्यपूर्ण पर्यावरणस्नेही बाग तयार झाली आहे.
ठाणे जिल्हा माहिती कार्यालयात एका अनोख्या बागेची चर्चा सर्वत्र आहे. ही केवळ बाग नाही लाकूड, प्लॅस्टिक संसाधनात रूपांतर करणाऱ्या जाणीवेचा एक आदर्श नमुना आहे. वस्तूंचा पुनर्वापर करून छतावर एक हिरवेगार आणि प्रेरणादायी बगिचा उभा करण्यात आला आहे. या बागेत ट्रेसीना, एलिफंट इयर, स्नेक प्लांट, हेनीकेनी, जास्वंद, लेमन ग्रास आणि ४५ प्रकारची विविध झाडे बघायला मिळतात.
विजयकुमार कट्टी यांनी या उपक्रमामागची माहिती सांगताना म्हणाले, “प्रत्येक वस्तू वापरून फेकण्याऐवजी तिला दुसरं आयुष्य देता येतं, हेच मी या बागेच्या माध्यमातून दाखवतो आहे. इथे प्रत्येक रोप म्हणजे शिक्षक आहे. तो आपल्याला संयम, जबाबदारी आणि निसर्गाशी संवाद शिकवतो.”
छतावर पर्यावरण स्नेही रचना करण्यात आली आहे. लाकूड, प्लास्टिक, कपड्यांचा वापर करून कार्यालय परिसरात उष्णता कमी करणारी झाडांची रचना आहे. नैसर्गिक डास प्रतिबंधक वनस्पतींचा समावेश करण्यात आला आहे.
बागेचा उद्देश केवळ हिरवळ निर्माण करणे नाही, तर लोकांमध्ये कचऱ्याविषयीचा दृष्टिकोन बदलणे, जागृती घडवणे आणि समाजात सकारात्मक वर्तन परिवर्तन घडवणे हा आहे. ते शासकीय विभाग, डीआयएसएच, डीआयसी, शैक्षणिक संस्था, बँकर्स, वकील, गृहिणी आणि उद्योजक यांच्यासाठी संवादात्मक सेमिनार घेण्याचे आवाहन करत आहेत.
“ही बाग केवळ उपक्रम न राहो, तर एक जनचळवळ बनावी, यासाठी शासन, समाज आणि प्रत्येक नागरिक यांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे आवाहन ट्री मॅन विजयकुमार कट्टी यांनी केले आहे.
या छतावरील बागेचे मॉडेल शाळा, महाविद्यालये, ग्रामीण भाग, गृहनिर्माण संस्था आणि शासकीय इमारतींमध्ये सहजपणे राबवता येऊ शकते. पर्यावरण संरक्षणाची ही कृती आधारित पद्धत ‘विचारातून कृती’कडे नेणारी ठरणार आहे, असे मत जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी व्यक्त केले आहे.