कबुतराला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानाने गमावला जीव

ओव्हरहेड वायरमधून वीजेच्या झटक्याने एक जवान जखमी

ठाणे: टोरंट पॉवर कंपनीच्या ओव्हरहेड वायरवर अडकलेल्या कबुतराची सुटका करण्यासाठी प्रयत्न करताना अग्निशमन दलाच्या दोन जवानांना विजेचा जबर धक्का बसला. यात एका जवानाचा मृत्यू झाला असून दुसरा जवान गंभीर जखमी आहे.

रविवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास सुदामा रेसिडेन्सी बाजूला, खर्डीगाव, दिवा-शीळ रोड, दिवा (पू.), ठाणे या ठिकाणी टोरंट पॉवर कंपनीच्या ओव्हरहेड वायरवर कबुतर अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली होती. माहिती मिळताच दिवा बीट अग्निशमन केंद्राचे जवान एका रेस्क्यू वाहनासह घटनास्थळी पोहचले. दरम्यान कबुतराची सुटका करत असताना अग्निशमन दलाच्या दोन जवानांना ओव्हरहेड वायरचा विजेचा धक्का बसला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे दाखल करण्यात आले. यावेळी उत्सव पाटील (२८) राहणार दातिवली गाव, दिवा यांचा मृत्यू झाला असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. तर आझाद पाटील (२९) राहणार वाडा, पालघर यांच्या हाताला आणि छातीला भाजले आहे.

घटनेचे वृत्त कळताच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा येथे उप आयुक्त दिनेश तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी श्री. झळके आणि अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत जवानाच्या प्रकृतीची माहिती घेतली.