नडगाव येथे गरोदर महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यासाठी डोली

वेळेत उपचार न मिळाल्याने प्रकृती बिघडली

शहापूर: शहापूर तालुक्यातील आदिवासी गावपाड्यांवर आजही रस्ता पोहोचला नसल्याने गरोदर महिलांना डोली करुनच मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत आहे. सोमवारी (दि.२३) नडगाव (सो) ग्रामपंचायत क्षेत्रातील चाफेवाडीमधील एका २१ वर्षीय गरोदर महिलेला एक किमी अंतर डोली करुन रुग्णवाहिकेपर्यंत आणावे लागल्याने वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत. परिणामी या महिलेला आकडी येवून तिची प्रकृती फारच बिघडल्याने ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.

शहापूरमध्ये वर्षानुवर्षे मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या आदिवासी बांधवांना रस्ते, पाणी, निवारा, आरोग्य, शिक्षण यांसाठी झगडावे लागत आहे. शाळकरी मुले, गरोदर महिला व आजारी रुग्णांना याचा मोठा फटका बसत आहे. सोमवारी किन्हवली परिसरातील नडगाव-नांदगाव ग्रामपंचायतमधील चाफेवाडी या कातकरी वाडीत राहणाऱ्या संगिता मुकणे या गरोदर महिलेवर याच असुविधांमुळे मृत्यूशी दोन हात करण्याची वेळ आली होती. चाफेवाडीत अजूनही मुख्य रस्त्याला जोडणारा अंतर्गत रस्ता झाला नसल्याने प्रसुती कळा सुरू होताच संगिताला डोली करुन चिखल आणि पाण्यातून मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागले. तेथून रुग्णवाहिकेद्वारे शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले गेले. मात्र या दरम्यान खूप वेळ गेल्याने तिला आकडीचा त्रास सुरू झाला. त्यामुळे शहापूर येथून ठाणे येथील सिव्हिल रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय डॉक्टरांना घ्यावा लागला.

या गरोदर मातेचे नशीब बलवत्तर म्हणूनच ती मृत्यूशी दोन हात करत सिव्हिल रुग्णालयापर्यंत पोहोचली. चाफेवाडीसारख्या ठाकूर, कातकरी वाड्यापाड्यांवर अशीच परिस्थिती वारंवार निर्माण होत असून संगितासारख्या भगिनींच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

दरम्यान शहापूर तालुक्यातील ६४ आदिवासी गावपाड्यांवर जाणारे रस्ते प्रलंबित असून त्यातच नडगाव (सो ) चाफेचीवाडीचा रस्ता येत असून खाजगी जागेतून हा पायरस्ता जात असल्याने रस्ता प्रलंबित असल्याचे समजते.

आदिवासी गावपाड्यांवरील प्रलंबित ६४ रस्त्यांपैकी ३४ रस्ते हे खाजगी जमिनीतून जातात. त्याबाबतचे अधिकार तहसीलदार यांना असून त्यांनी ते वापरावेत यासाठी आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. तसेच उर्वरित ३० रस्ते वनाच्या जागेतील असून १५ ठिकाणी ३/२ चे प्रस्ताव मंजूर आहेत. हे सर्व रस्ते व्हावेत यासाठी आम्ही मागील वर्षी आंदोलनही केले होते, असे श्रमजीवी संघटनेचे प्रकाश खोडका यांनी सांगितले.