नवी मुंबई : उद्या २ मार्चपासून माध्यमिक शालांत परीक्षा सुरू होणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्याच्या हॉल तिकीटावर परीक्षा केंद्र नमूद करण्यात आलेले आहेत. मात्र परीक्षेच्या एक दिवस आधी अचानक इयत्ता दहावीच्या काही विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र बदलण्यात आल्याने पालक आणि परीक्षार्थी विद्यार्थी वर्गाची एकच तारांबळ उडाली आहे. सुमारे २३५ मुलांच्या केंद्रात अचानक बदल करण्यात आला आहे.
2 मार्चपासून दहावीच्या शालांत परीक्षा सुरू होत आहेत. वाशी येथील मोनामी आयसीएल शालेय केंद्रातील २३५ विद्यार्थ्याच्या आसन व्यवस्थेत बदल करून त्यांना वाशी सेक्टर १० येथील एका उर्दू शाळेत हलवण्यात आले आहे. मात्र ज्या ठिकाणी हे केंद्र हलवण्यात आले आहे, त्या उर्दू शाळेत आसनव्यवस्था याबाबत माहिती लावण्यात आली नसल्याने विद्यार्थी आणि पालक आणखी संभ्रमित झाल्याचे पाहण्यास मिळाले. दरम्यान परीक्षेच्या आदल्या दिवशी केंद्रात बदल केल्याने विद्यार्थी आणि पालक मात्र चांगलेच हवालदिल झाले आहेत. साध्या फलकावर माहिती लिहून केंद्र बदलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. पालकांना केंद्रात बैठक व्यवस्था बघण्यासाठी आल्यावर हा प्रकार समजला. माध्यमिक शालांत परीक्षेच्या अत्यंत महत्वपूर्ण कारभारात झालेल्या या बदलाने नाराजी व्यक्त केली जात आहे. मराठी माध्यमाचा पहिला पेपर २ मार्च तर इंग्रजी माध्यमाचा पेपर ३ मार्चपासून सुरू होत आहे. परीक्षा मंडळाने दिलेल्या हॉल तिकीटनुसार आसन व्यवस्था परीक्षेच्या आदल्या दिवशी केंद्रात बघण्यासाठी गेल्यावर परीक्षा केंद्रच बदलण्यात आल्याचे निदर्शनास आले, मात्र याबाबत शाळा व्यवस्थापनाकडून माहिती देण्याचे टाळले जात आहे.
परीक्षा केंद्रात बदल झाल्याची माहिती बुधवार १ मार्च रोजी दुपारनंतर विविध शिक्षकांनी समाज माध्यम आणि ग्रुपमधून पालकांना दिल्यावर अनेक पालकांना उशिरा केंद्रात बदल झाल्याची माहिती मिळाली. परीक्षा केंद्रात बदल झाल्याची माहिती मिळाली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या एक दिवस आधी अचानक केंद्रात बदल करण्याचे विद्यार्थी नाहक तणावात जाऊ शकतात. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. केंद्रात बदल करण्याचा अधिकार किंवा याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ प्रशासन यांचा असल्याने त्यांनी या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घातले पाहिजे, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष नवी मुंबई पालक संघर्ष समितीचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी दिली.
एखाद्या परीक्षा केंद्रावर जर ऐनवेळी विद्यार्थी संख्या वाढली तर त्या शाळेमार्फत उपकेंद्र दिले जाते. त्या ठिकाणी आसन व्यवस्था करण्यात येते व त्याची माहिती संबधित शाळा प्रदर्शित करते, अशी माहिती मुंबई माध्यमिक शिक्षण मंडळाचे शिक्षण अधिकारी सुभाष बोरसे यांनी दिली.