गाडी जळून खाक; प्रवासी थोडक्यात बचावले

समृद्धी महामार्गावर धावत्या कारला भीषण आग

शहापूर : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील खुटघर टोल प्लाझा परिसरात मंगळवारी दुपारच्या सुमारास थरारक घटना घडली. नागपूरच्या दिशेने वेगात धावणाऱ्या फोर्ड फिगो (क्र.एमएच ४८-ए-४५१२) या कारला अचानक आग लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ गाडी बाजूला थांबवली. गाडीतील सर्व प्रवाशांनी वेळ न दवडता बाहेर उडी घेतली. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काही वेळातच आगीचे लोळ आकाशात झेपावत असल्याने महामार्गावर एकच खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीच्या भीषणतेमुळे काही काळ समृद्धी महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस आणि कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तत्काळ उपाययोजना केल्या.

कारला आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आलेले नाही. शॉर्टसर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेचा पुढील तपास समृद्धी महामार्ग पोलीस करत असून वाहनातील प्रवासी आणि चालकाचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.