ठाणे : ठाणे येथील तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी आणि खाजगी व्यक्ती यांना दहा लाख रुपयांची लाच स्वीकारताना अँटी करप्शन ब्युरो, ठाणे यांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतचा गुन्हा ठाणे नगर पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आला आहे.
लोकसेवकाचे नाव महेंद्र पाटील (51) असे असून ठाणे तहसीलदार कार्यालयात मंडळ अधिकारी आहे. वाजिद महेबुब मलक (63) हा खाजगी व्यक्ती आहे. लोकसेवक महेंद्र पाटील यांनी आणि वाजिद महबूब मलक यांनी तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितली होती आणि त्यांनी दोन लाख रुपयांची लाच रक्कम स्वीकारली आहे.
या गुन्ह्यातील तक्रारदार यांचे ठाणे येथील ‘रेमंड कंपनी’ येथे चालू असलेल्या साईटवर खोदकाम करण्यासाठी मिळालेल्या अनुमतीपेक्षा (परमिशन) जास्तीचे खोदकाम ते करत असून, त्याबाबतचा खोटा अहवाल (रिपोर्ट) वरिष्ठ कार्यालयाला सादर न करण्यासाठी लोकसेवक महेंद्र पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा लाख रुपयांची लाचेची मागणी केल्याबाबतची तक्रार 18 डिसेंबर रोजी ‘एसीबी’कडे प्राप्त झाली होती.
तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने 18 डिसेंबर २३ रोजी पडताळणी केली असता, नमूद आरोपी गजानन पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडीनंतर अंतिम सहा लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यापैकी पहिला हप्ता दोन लाख हा 20 डिसेंबर रोजी आणि दुसरा हप्ता चार लाख हा 23 डिसेंबर रोजी स्वीकारण्याचे मान्य केले होते.
ठाणे एसीबी युनिटने सापळ्याचे आयोजन करून आरोपी गजानन पाटील यांना तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये स्वीकारले. ती रक्कम आरोपी वाजीद महेबूब यांच्याकडे ठेवण्यास दिली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.
या गुन्ह्यासंबंधी मार्गदर्शन अधिकारी, एसीबी प्रतिबंध विभागाचे अधीक्षक सुनील लोखंडे हे आहेत.