फेरीवाल्यांसाठी लेबर फ्रंटचा धिक्कार मोर्चा

अंबरनाथ: अंबरनाथ शहरातील फेरीवाल्यांच्या उपजिविकेचे संरक्षण करून त्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी लेबर फ्रंट संघटनेच्या माध्यमातून नगरपालिका कार्यालयावर धिक्कार मोर्चा काढण्यात आला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर)चे अध्यक्ष श्याम गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

नगरपालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कारवाई केली होती. हटवण्यात आलेल्या फेरीवाल्यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासोबतच शहरात स्वतंत्र फेरीवाला क्षेत्र (हॉकर्स झोन) निर्माण करण्याची मागणी श्री. गायकवाड यांनी केली.

फेरीवाल्यांच्या समस्यांसंदर्भात अडीच महिन्यांपूर्वी पालिका प्रशासनाला निवेदन देऊनही योग्य कार्यवाही झाली नसल्याने श्री. गायकवाड यांनी संताप व्यक्त केला. छाया रुग्णालय परिसरात फेरीवाल्यांना हटविल्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. पालिका प्रशासनाने शहरातील १३०० नोंदणीकृत फेरीवाल्यांना तत्काळ परवाने देण्यात यावेत तसेच जोपर्यंत नगरपालिका फेरीवाला क्षेत्र निश्चित करत नाही तोपर्यंत फेरीवाल्यांना आहे तेथेच व्यवसाय करू द्यावा, अशी मागणी गायकवाड यांनी केली. तसेच मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने लेबर फ्रंट फेरीवाला युनियनचे पदाधिकारी, सदस्य आणि फेरीवाले या आंदोलनात सहभागी झाले होते.